मुंबईतील एक रिक्षा चालक रविवारी संध्याकाळी डोंबिवलीत येऊन प्रवासी वाहतूक करत होता. फडके रस्त्याने बाजीप्रभू चौकातून भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे रिक्षा चालवत या तरुण रिक्षा चालकाने एका महिलेच्या पायावरुन रिक्षा नेऊन तिला जखमी केले. तिला मदत करण्याऐवजी तेथून तो पळू लागला. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक सेवकाने या रिक्षेचा पाठलाग करत त्याला इंदिरा चौकात अडविले.
हा पाठलाग करताना वाहतूक सेवकाला रिक्षा चालकाने १० फूट फरफटत नेले. तरीही रिक्षा चालक वाहतूक सेवकाला दाद देत नव्हता. वाहतूक सेवकाने रिक्षा चालकाची काॅलर पकडली. त्याला रोखून धरले. इतर प्रवाशांनी ओरडा केल्यावर आणि आता आपण पकडले जाऊ या भितीने त्याने इंदिरा चौकात रिक्षेला ब्रेक लावले.फडके रस्ता रविवारी गर्दीने भरुन गेलेला असतो. या रस्त्यावरुन या रिक्षा चालकाने इतर रिक्षा चालकांना मागे टाकत, प्रवाशांना धक्के देत रिक्षा चालविली असल्याच्या तक्रारी इतर रिक्षा चालक आणि पादचाऱ्यांनी केल्या.
हेही वाचा >>>ठाणे: पाणीपुरी खाण्यास पैसे दिले नाही म्हणून जीवेठार मारण्याचा प्रयत्न
ज्या महिलेला तू जखमी केले आहेस त्याची भरपाई कोण करणार, असा प्रश्न वाहतूक पोलिसाने केल्यावर रिक्षा चालक निरुत्तर झाला. त्याला वाहतूक पोलीस कार्यालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी दररोज कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागात गस्त घालून बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.