डोंबिवली: येथील एमआयडीसीतील मिलापनगर भागातील एक बंगल्याच्या शेजारी विजेचा एक खांब गंजला आहे. या खांबावरील वाहिनीतून वीज पुरवठा होत नसला तरी जमिनीलगत गंजलेला लोखंडी विजेचा खांब कोणत्याही क्षणी कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता या भागातील रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
एमआयडीसीतील मिलापनगर मधील आरएल-७९ या बंगल्या जवळ हा अतिधोकादायक स्थितीमधील खांब उभा आहे. या धोकादायक स्थितीत असलेल्या विजेच्या खांबाजवळून दररोज अनेक पादचारी, शाळकरी मुले, पालक येजा करतात. सकाळ, संध्याकाळ डोंबिवलीतील अनेक रहिवासी या भागात फिरण्यासाठी येतात.
मागील काही दिवसांपासून दररोज संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडतो. यावेळी हा खांब कोसळण्याची भीती आहे. सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर हा खांब आहे. या भागातून येजा करणाऱ्या दुचाकी स्वार, रिक्षा किंवा मोटारीवर हा धोकादायक स्थितीमधील खांब पडला तर दुर्घटना होण्याची शक्यता रहिवाशांनी वर्तविली.
हेही वाचा… मुंब्र्यात दोन महिन्यात आठ मजली बेकायदा इमारतींची उभारणी; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. श्रीकांत गडकरी या विजेच्या खांबा शेजारील बंगल्यात राहतात. एक अति महत्वाच्या शासकीय अधिकाऱ्याचे या भागात निवासस्थान असल्याने पोलिसांची या भागात सतत गस्त असते. या भागातील काही रहिवाशांनी याप्रकरणी महावितरणकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेतली जात नाही, असे रहिवाशांनी सांगितले. काही दुर्घटना घडण्यापूर्वी महावितरणने तातडीने हा धोकादायक स्थितीमधील विजेचा खांब काढून टाकावा, अशी मागणी रहिवाशांची आहे.