जयेश सामंत
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार निवडून यावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पद्धतशीरपणे मोर्चेबांधणी करणाऱ्या भाजप नेत्यांनी कल्याणपाठोपाठ आता ठाण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे संयोजक डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर भागातील पक्षाचे आमदार तसेच प्रमुख नेत्यांची एक बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी २५ प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली.
लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ पासून युतीच्या राजकारणात ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीचा एकमेव अपवाद वगळला तर जुन्या ठाणे जिल्ह्याचा भाग असलेला पालघर लोकसभा मतदारसंघही शिवसेनेकडे आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक आठ मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा वरचष्मा असला तरी ग्रामीण भागात मात्र भाजपकडे प्रभावी नेत्यांनी मोठी फळी आहे. कल्याण आणि ठाणे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या दोन्ही मतदारसंघांत भाजपने जोरदार तयारी सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उमेदवारीसाठी चुरस
कल्याण आणि ठाणे या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा अजूनही कायम आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे गटात असल्याने भाजप नेत्यांचा ठाण्यासाठी आग्रह वाढताना दिसत आहे. ठाण्याची जागा शिंदे यांच्या शिवसेनेसाठी गेली तरी तेथून कोण उमेदवार असेल याविषयी स्पष्टता नाही. याउलट भाजपमध्ये मात्र ठाण्यासाठी वेगवेगळय़ा नावांची चर्चा आतापासूनच सुरू आहे. भाजपचे ठाणे लोकसभेचे संयोजक डॉ. विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार संजीव नाईक तसेच ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर अशी तिघांची नावे उमेदवार म्हणून गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. ठाण्याचे आमदार केळकर आणखी एकदा विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असले तरी भाजपची सध्याची कार्यपद्धती पाहता श्रेष्ठींच्या पुढे कुणाचे काही चालेल ही शक्यता कमीच आहे.
ठाण्यात भाजपचे प्राबल्य?
ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रापैकी तीन ठिकाणी भाजपचे, तर दोन ठिकाणी एकनाथ शिंदे गटातील आमदार आहेत. मीरा-भाईदर विधानसभा मतदारसंघातून गेल्यावेळेस गीता जैन या अपक्ष म्हणून निवडून आल्या. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी शनिवारी भाजप नेत्यांनी घेतलेल्या बैठकीत आमदार जैन या उपस्थित होत्या. विशेष म्हणजे मीरा-भाईदर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढलेले तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता मात्र या बैठकीस उपस्थित नव्हते. ठाणे लोकसभा मतदारसंघातील भाजपची वाढलेली ताकद लक्षात घेता हा मतदारसंघ भाजपनेच लढवावा, असा सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीस नवी मुंबईतील प्रभावी नेते गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे हेदेखील उपस्थित होते.