डोंबिवली जवळील २७ गावामधील भोपर गावात शनिवारी पहाटे प्रसाद पाटील यांच्या घराला आग लागली. गाव गाढ झोपेत असताना ही घटना घडली. पाटील कुटुंबियांना घरात खूप धूर झाला असल्याचे दिसले. त्यांनी उठून पाहिले तर घराला चारही बाजूने आग लागली आहे. तात्काळ त्यांनी आपल्या पत्नी मुलींसह घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे ते थोडक्यात बचावले.
हेही वाचा- मध्य रेल्वेचा खोळंबा ; ठाणे रेल्वे स्थानकात तुफान गर्दी
आगीमध्ये प्रसाद पाटील यांची पत्नी प्रीती, त्यांच्या दोन मुली समीरा आणि समीक्षा गंभीर भाजल्या आहेत. त्यांना तात्काळ गावकऱ्यांनी डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले आहे. प्रसाद पाटील हेही गंभीररित्या होरपळले आहेत. आगीची माहिती तात्काळ अग्निशमन जवान, पोलिसांना देण्यात आली. तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा- डोंबिवलीजवळील २७ गावांना ९० दशलक्ष पाणी पुरवठा ; मंत्री उदय सामंत यांचे आदेश
जवानांनी एक तासाच्या प्रयत्नात आग विझवली. पहाटेची वेळ आणि हवा नसल्याने आग विझविण्यात अडथळे आले नाही आणि आग पसरली नाही, अशी माहिती अग्निशमन जवानांनी दिली. आग कशामुळे लागली, विद्युत प्रवाहात अडथळा येऊन आग लागली की कोणी पूर्ववैमनस्यातून हा प्रकार केला आहे याचा तपास पोलीस करत आहेत. पाणी टंचाई, केबल चालकाची आत्महत्या, रस्ता अडवून कमानीची उभारणी करणे अशा काही कारणांनी भोपर गाव सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.