ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची शुक्रवारी पुण्यतिथी निमित्ताने ठिकठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्याचे कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने ठाणे शहरात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये शक्तीप्रदर्शनासाठी चढाओढ पाहायला मिळाली. दोन्ही गटाचे शेकडो कार्यकर्ते आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी म्हणजेच, शक्तीस्थळ आणि टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जमले होते. दोन्ही गट समोरासमोर आल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, टेंभीनाका आणि आनंद आश्रम येथील गर्दीमुळे शहरात वाहतूक कोंडीही झाली होती. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. पायी जाणाऱ्या नागरिकांनाही पोलीस रोखत होते. त्यामुळे नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात होता.आनंद दिघे यांचे २६ ऑगस्ट २००१ मध्ये निधन झाले होते. त्यामुळे दरवर्षी २६ ऑगस्टला त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिवसेनेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे.
हेही वाचा : कल्याण : शहापूर जवळील बिरवाडी गावात २७ लाखाचा बनावट मद्य साठा जप्त
आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे यांसारखे शिवसेनेतील ठाण्यातील महत्त्वाचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये आहेत. तर ठाण्याचे खासदार राजन विचारे, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे, आनंद दिघे यांच्या काळातील अनिता बिर्जे यांसारखे शिवसैनिक अद्यापही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे शुक्रवारी आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमास सर्वांचे लक्ष लागून होते.उद्धव ठाकरे गटातील केदार दिघे यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी असल्याने दुपारी १२ वाजता त्यांनी ठाण्यातील शिवसैनिकांना कोर्टनाका येथील शासकीय विश्राम गृहाजवळ जमण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार खासदार राजन विचारे यांच्यासह शेकडो शिवसैनिक त्याठिकाणी जमले होते.
शिवसैनिकांकडून घोषणाबाजी केली जात होती. त्यानंतर या शिवसैनिकांनी दिघे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांच्या स्मृतीचे दर्शन घेतले. तर टेंभीनाका येथे आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी जमण्यास सुरूवात झाली होती. त्याचवेळी विचारे, केदार दिघे हे शेकडो शिवसैनिकांसह आनंद आश्रमामध्ये दाखल झाले. त्यामुळे तणावाचे वातावरण झाले होते. दोन्ही गटाकडून आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ घोषणाबाजी दिली जात होती.
आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुतळ्यास अभिवादन करून निघून केले.त्यानंतर अवघ्या काही मिनीटांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे टेंभीनाका येथे आनंद आश्रमात दाखल झाले. त्यांनीही दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर ते देखील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी गेले. या दोन्ही गटातील शक्तीप्रदर्शनामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.
वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण
टेंभीनाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने पोलिसांनी टेंभीनाका परिसरात दोन्ही रस्ते रोखून धरले होते. त्यामुळे टेंभीनाका ते गोकूळनगर, ठाणे स्थानक बाजारपेठेतील रस्ता, तलावपाली परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पायी चालत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांनाही १५ ते २० मिनीटे पोलिसांनी रोखले होते. टेंभीनाका, कोर्टनाका परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे न्यायालय आहे. त्यामुळे कामानिमित्ताने अनेक नागरिकांना अडकून राहावे लागले. त्यामुळे नागरिकांकडून पोलिसांविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती.