ठाणे – जिल्हा महिला बालविकास विभागाच्या वतीने सोमवारी उल्हासनगर शहरात धडक कारवाई करून एका १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात आला आहे. उल्हासनगर शहरातील भाटिया हॉल येथे एक बालविवाह सुरू असल्याची माहिती एका अनोळखी संपर्क क्रमांकावरून बाल संरक्षण विभागाला देण्यात आली. यानंतर तातडीने उल्हासनगर गाठत जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी हा विवाह रोखला असून दोन्ही कुटुंबियांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. 

घरातील बेताची आर्थिक परिस्थिती, पालकांचे आजारपण, शिक्षणासाठी पैसे नसणे, मुलींची सुरक्षितता अशी अनेक कारणे देत कुटुंबीय त्यांच्या अल्पवयीन मुलींचा बालविवाह करून देत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहेत. याच पद्धतीचा प्रकार उल्हासनगर शहरात घडून आला आहे. उल्हासनगर शहरातील सेक्टर – ५ येथे संबंधित मुलीचे कुटुंब राहते. या कुटुंबीयांना त्यांच्या १६ वर्षीय मुलीचा सोलापूर येथील २४ वर्षीय मुलासमवेत बालविवाह करण्याचे ठरविले. यासाठी शहरातील भाटिया हॉल येथे सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी सर्व नियोजन करण्यात आले होते. दोन्ही कुटुंबीयांचे नातेवाईक ही या ठिकाणी उपस्थित होते.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती एका अनोळखी महिलेने चाईल्ड लाईनच्या १०९८ या संपर्क क्रमांकावर दिली. यानंतर सर्व चक्र फिरली आणि जिल्हा महिला बालविकास विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी लागलीच उल्हासनगर शहरात धाव घेतली. यानंतर लग्न स्थळी दाखल होऊन जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी बालविवाह रोखला. तर तत्पूर्वी मुलीच्या वयाची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मुलगी शिकत असलेल्या शाळेतून वयाचे प्रमाणपत्र मिळवले. यामध्ये मुलगी अवघी १६ वर्ष ३ महिन्यांची असल्याचे निष्पन्न झाले. यानुसार जिल्हा महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही कुटुंबीयांना बाल कल्याण समिती समोर हजर केले असून मुलीच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले. मुलीला सद्यस्थितीत बालसुधारगृहात पाठविण्यात आले असून दोन्ही कुटुंबियांविरुद्ध बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे.

संबंधित मुलीच्या वडिलांना दोन वेळेस हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती अस्थिर आहे. घरची आर्थिक परिस्थिती देखील बेताची असल्याने मुलीच्या लग्नाचा घाट घातल्याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांनी समुपदेशना दरम्यान दिली.

बालविवाहामुळे माता मृत्यू दर वाढण्याचे प्रमाण आजही जास्त आहे. बालके ही कुपोषित जन्माला येतात. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढते. ज्यांना कोणालाही बालविवाह होत असल्याबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ १०९८ या नंबर वर संपर्क करावा. माहिती दिलेल्या व्यक्तीचे नाव हे गुपित ठेवले जाते, अशी आवाहन जिल्हा महिला बालविकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Story img Loader