कल्याण – एका मुलीला भर रस्त्यात शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या एका तरुणाला दोन तरुणांनी तिला मारहाण का करतोस, असा प्रश्न केला. त्याचा राग येऊन शिवीगाळ करणाऱ्या तरुणाने आपल्या सहकारी सात ते आठ तरुणांना घटनास्थळी बोलावून जाब विचारणाऱ्या तरुणांना बेदम मारहाण केली.
कल्याण जवळील शहाड येथील मंगेश पॅरेडाईज, मातोश्री महाविद्यालय रस्ता भागात ही घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणात प्रणव कोनकर, दर्शन कोनकर आणि इतर तीन अनोळखी इसमांविरुद्ध तक्रारदार विद्यार्थी योगेश मनोजकुमार चौधरी (२०) याने तक्रार केली आहे. खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा – जुनी निवृत्तीवेतन योजना : ठाणे जिल्ह्यातून २० हजार कर्मचारी संपावर
हेही वाचा – कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलचा स्वयंचलित दरवाजा उघडत नसल्याने प्रवाशांची तारांबळ
पोलिसांनी सांगितले, शहाड जवळील मंगेश पॅरेडाईज इमारतीत तक्रारदार योगेश राहतो. शुक्रवारी रात्री भोजन झाल्यावर योगेश व त्याचा मित्र फिरण्यासाठी घराबाहेर पडले. तेव्हा तेथील रस्त्यावर एक तरुण एका मुलीला शिवीगाळ आणि मारहाण करत होता. हा प्रकार पाहून योगेश आणि त्याच्या मित्राने शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला तू त्या मुलीला मारहाण का करतोस, असा प्रश्न केला. तुम्ही आमच्या भांडणात पडू नका, असे बोलून तरुणाने आपल्या सात ते आठ मित्रांना घटनास्थळी बोलविले. त्यांनी जाब विचारणाऱ्या योगेश आणि त्याच्या मित्रावर हल्ला चढविला. दोघांना लाथाबुक्क्यानी मारहाण करत योगशेला बॅटने मारहाण करण्यात आली. या झटापटीत योगशेच्या गळ्यातील सोनसाखळी, हातामधील सोन्याचा कडा, अंगठी रस्त्यावर पडली. ती तेथे शोधूनही सापडली नाही.