कल्याण– कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावर चक्कीनाका येथे रस्ता ओलांडत असताना एका विद्यार्थीनीला भरधाव वेगात असलेल्या रिक्षा चालकाच्या रिक्षेने जोराची धडक दिली. या धडकेत विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली. तिला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत न करता रिक्षा चालक घटनास्थळावरुन पळून गेला.
मलंगगड रस्त्यावरील चेतन शाळेच्या जवळ सोमवारी सकाळी हा अपघात घडला. १९ वर्षाची एक विद्यार्थीनी पिसवली भागात कुटुंबासह राहते. घर दुरुस्तीचे सामान घेऊन ती मलंगगड रस्त्याने पायी चालली होती. यावेळी तिला एमएच-०५-डीझेड-८३१४ या वाहन क्रमांकाच्या रिक्षा चालकाने जोराची ठोकर दिली. रिक्षा चालक भरधाव वेगात होता.
हेही वाचा >>> शिळफाटा रस्त्यावर ३०० बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई, ७५ हजाराचा दंड वसूल
रिक्षेवरील त्याचे नियंत्रण सुटल्याने त्याने विद्यार्थीनीला धडक दिली. विद्यार्थीनीच्या हात, पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तिचे दोन दात पडले आहेत. या तरुणीला मदत करण्याऐवजी रिक्षा चालक घटनास्थळावरुन पळून गेला. या तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रिक्षा वाहन क्रमांकावरुन पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.