ठाणे : तडीपार गुंडाला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तलवारीने हल्ला करण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. सरफअली मोहम्मद युनूस शेख (४२) असे त्याने नाव असून पोलिसांच्या पथकाने या तडीपारच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सरफअली विरोधात एकूण १२ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भिवंडी येथील गैबीनगर परिसरात राहणाऱ्या सरफअली याला ठाणे पोलिसांनी नुकतेच तडीपारीचे आदेश दिले आहे. त्यानुसार, त्याला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून एका वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. असे असतानाही तो भिवंडीत वास्तव्यास होता. दरम्यान, गुरुवारी दुपारी तो त्याच्या मोटारीने वाहतुक करत होता. पोलिसांनी त्याला रोखले. त्यावेळी त्याच्या मोटारीमध्ये शस्त्र आढळून आले. पोलिसांना पाहताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.

पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तलवार भिरकावत पोलिसांना धमकी दिली. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम १३२, सह आर्म ॲक्ट क्रमांक ४, २५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५ आणि १४२ प्रमाणे क्रिमीनल लाॅ अमेंडमेंट ॲक्ट ३ आणि ७ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.