ओएलएक्सवर वाहन विकण्याचा बहाणा करुन एका बनावट लष्करी जवानाने कल्याण मध्ये शिंपीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रारदाराने तोतया जवानासह त्याच्या दोन साथीदारांची तक्रार केली आहे.रंजित सिंग (रा. चंदेली, वाराणसी ) असे गुन्हा दाखल झालेल्या तोतया जवानाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार अरविंद कुमार शामलाल बिंद (३२) कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहतात. त्यांचा याच परिसरात कपडे शिवण्याचा व्यवसाय आहे. जवळ पुंजी असल्याने काही दिवसांपासून ते एखादे वाहन खरेदी करण्याचा विचार करत होते. कमी किंमतीत वाहन मिळविण्यासाठी ओएलएक्स उपयोजनवर ते प्रयत्न करत होते. उत्तर प्रदेशातील निवासी रंजित सिंग याने ओएलएक्स उपयोजनवर आपले मालकीचे वाहन विकण्याची माहिती दिली होती.
हेही वाचा>>>ठाण्यात स्वच्छता नियमांचे उल्लंघन महागात पडणार; महापालिकेने केली दंडाच्या रकमेत मोठी वाढ
उपयोजनवरील माहिती बघून कल्याणकर बिंद यांनी रंजित सिंग याच्याशी नोव्हेंबर मध्ये मोबाईलवर संर्पक करून वाहन खरेदीची बोलणी केली. वाहनाचा व्यवहार ठरवताना आरोपी रंजित याने आपण लष्करी जवान असल्याची बतावणी केली होती. कल्याणकर यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता. दोघांमध्ये वाहन खरेदीची यशस्वी बोलणी झाली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अरविंदकडून आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांनी ऑनलाईन एक लाख ३४ हजार रुपयांची रक्कम उकळली. रक्कम भरणा केल्यानंतर वाहनाचा ताबा देण्याची मागणी अरविंदकुमार यांनी केली. किरकोळ कारणे सांगून आरोपी वाहन देण्यास टाळाटाळ करू लागले. दिवसातून चार ते पाच वेळा ते आरोपींना संपर्क करत होते. ते प्रतिसाद देत नव्हते. त्यानंतर आरोपींनी त्यांचे मोबाईल फोन बंद केला. आरोपींकडून प्रतिसाद येणे बंद झाल्यानंतर अरविंदला फसवणूक झाल्याची खात्री पटली. अरविंद यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.