लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे: येथील वागळे इस्टेट भागातील दोन दूध डेअरींची जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने अचानक तपासणी केली असून त्यामध्ये अस्वच्छ वातावरणात पनीर तयार करण्यात येत असल्याचे पथकाला आढळून आले. पथकाने सुमारे ४ लाख १ हजार ३७४ रुपये किंमतीचे पनीर, दूध आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीअंतर्गत अन्न व औषध प्रशासन कोकण विभागाचे सह आयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे विभागाने वागळे इस्टेट मधील मे. केवला डेअरीची अचानक तपासणी केली. त्यात या ठिकाणी अस्वच्छ वातावरणात पनीरचे उत्पादन होत असल्याचे आढळून आहे. या ठिकाणी पनीर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे म्हशीचे दूध आणि पनीरचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच म्हशीचे ५९८ लिटर आणि ७९ किलो पनीर असा एकूण ४५ हजार ३१६ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यापैकी म्हशीचे दूधाचा साठा नाशवंत असल्याने नष्ट करण्यात आला.
हेही वाचा… भातसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा
वागळे इस्टेट येथील मे. यादव मिल्क प्रोडक्ट्स या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनच्या पथकाने अचानक तपासणी केली. याठिकाणी पनीर आणि पनीर ॲनलॉग हे अत्यंत अस्वच्छ वातावरणात विनापरवाना तयार करण्यात येत असल्याचे आढळून आले. या ठिकाणी स्वच्छता करून परवाना घेईपर्यंत पेढी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या ठिकाणी पनीर, पनीर ॲनलॉग, स्कीमड मिल्क, सायट्रिक ॲसिड, मोनोसोडियम ग्लोउटेण, रिफाईन्ड पामोलीन ऑईलचे नमुने घेण्यात आले.
हेही वाचा… ठाण्यात करोना रुग्ण संख्येत वाढ; चाचण्यांची संख्या वाढविलेली नसतानाही रुग्ण वाढले
सुमारे ३ लाख ५६ हजार ५८ रुपये किंमतीचे पनीर, पनीर अनॅलॉग, दूध, रिफाईंड पामोलिव्ह ऑइल व इतर साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच ३८२ किलो पनीर व पनीर ॲनलॉग, २८ लिटर दूध, सायट्रिक असिड, २८९३.४ किलो रिफाईंड पामोलिव्ह ऑईल आदी साठा जप्त करण्यात आला आहे. या आस्थापनेस तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करेपर्यत अन्न सुरक्षा मानके कायदा (अन्न परवाने व नोंदणी) नियमन २०११ चे नियमन २.१.१४(१) अंतर्गत असलेल्या निर्देशांचे तंतोतत पालन करणे अन्न व्यवसाय चालकावर बंधनकारक असून त्याचे उल्लंघन केल्यास हे उल्लंघन अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ चे कलम ५५ अंतर्गत २ लाखापर्यंतच्या द्रव्य दंडास पात्र ठरते, असे सहआयुक्त देशमुख यांनी सांगितले.