काही महिन्यांपासून कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरात दुचाकी, रिक्षेचे चोरीचे प्रमाण वाढले आहे. दररोज एक ते दोन दुचाकी, रिक्षा चोरीला जात आहे. या चोऱ्यांचा तपास पोलिसांच्या विशेष पथकांबरोबर कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस समांतर पध्दतीने करत आहेत. अशाच दुचाकी चोरीतील दोन सराईत चोरट्यांना कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कल्याण पूर्वेतील व्दारली भागातून अटक केली.
हेही वाचा- ठाणे: टिटवाळ्यात शिक्षिकेच्या घरात चोरी
त्यांच्याकडून तीन चोरीच्या मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी कोळसेवाडी, विष्णुनगर, खडकपाडा, महात्मा फुले ठाणे हद्दीत दुचाकी चोरी केल्या आहेत. .रमजान इब्राहिम शेख (२०) असे सराईत चोरट्याचे नाव आहे. तो चोरीसाठी अल्पवयीन मुलाचा वापर करत होता. विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका दुचाकी चोरीचा तपास करताना कल्याण गु्न्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांना चोरीला गेलेल्या दुचाकी घेऊन काही इसम कल्याण पूर्वेतील व्दारली गावातील गणपती मंदिरा समोर येणार आहेत. ते याठिकाणी दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच, व्दारली गाव हद्दीत गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शिरसाठ, पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, उपनिरीक्षक मोहन कळमकर, हवालदार विश्वास माने, गुरुनाथ जरग, अमोल बोरकर, सचिव साळवी, वसंत बेलदार, विलास कडू, किशोर पाटील, सचिन वानखेडे, ज्योत्सना कुंभारे, विनोद चन्ने, मिथुन राठोड, राहुल ईशी यांनी सापळा लावला. साध्या वेशामध्ये पोलीस या भागात वावरत होते.
हेही वाचा- गुंड गणेश जाधव हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक
ठरल्या वेळेत शुक्रवारी दुपारी आरोपी व्दारली गाव गणपती मंदिरा समोर आले. ते या भागात घुटमळू लागले. एका साध्या वेशातील पोलिसाने येथे काय करता म्हणून त्यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दुचाकी तुमची आहे का. दुचाकीची कागदपत्र कोठे आहेत असे प्रश्न पोलिसाने करताच दोन्ही आरोपी घाबरले. त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याक्षणी सापळा लावून असलेल्या पथकाने दोन्ही आरोपींना घेरले. त्यांना गुन्हे शाखा कार्यालयात आणले. त्यांची वरिष्ठ निरीक्षक शिरसाठ यांनी चौकशी करताच त्यांनी आपले नाव रमजान इब्राहिम शेख आणि एका अल्पवयीने मुलाने आपले नाव उघड केले. रमजान याची चौकशी करताच त्याने कल्याण, डोंबिवलीत दुचाकीचे तीन गुन्हे केले आहेत अशी कबुली दिली. त्याचा साथीदारा अल्पवयीन असल्याचे तपासात उघड झाले. रमजानने गेल्या वर्षभरात विष्णुनगर, कोळसेवाडी हद्दीतून पाच दुचाकी चोरल्या आहेत. त्याच्यावर तसे गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरात गोळीबार, कुख्यात गुंड गणेश जाधवची हत्या
पोलिसांनी रमजानला अटक केली. अल्पवयीन मुलाची बाल सुधारगृहात रवानगी केली. दोन्ही आरोपी विष्णुनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. चोरीच्या तीन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.