डोंबिवली, कल्याण परिसरात महागड्या दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली आहे. या चोरट्याच्या अटकेने डोंबिवली, कल्याण परिसरात आतापर्यंत झालेल्या वाहन चोरीच्या घटना उघडकीला येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

काशीम युनूस अली (२२) असे चोऱट्याचे नाव आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील कुलममुर ग्यानपूर गावचा रहिवासी आहे. काशीम हा मुंबईत झटपट कामधंदा मिळतो आणि पैसेही मिळतात म्हणून कल्याण मध्ये आला. त्याला येथे आल्यापासून कोठेच काम मिळाले नाही. उपजीविका कशी करायची असा प्रश्न त्याच्या समोर होता. त्याने शक्कल लढवून दुचाकी चोरुन त्या विक्री करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – कचरा कल्याण-डोंबिवलीत , फोन मात्र लातुरला

कल्याण गु्न्हे शाखेतील हवालदार गुरुनाथ जरग यांना दुचाकी चोरणारा एक चोरटा दुचाकी विकण्यासाठी कल्याण शिळफाटा रस्त्यावरील प्रीमिअर काॅलनी येथे येणार आहे अशी माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांना दिली. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन कळमकर, हवालदार गुरुनाथ जरग यांच्या पथकाने तात्काळ काॅलनी भागात सापळा लावला. तिथे तो तरुण दुचाकी वरुन येताच पोलिसांनी त्याला हटकले. तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत त्याने कल्याण, डोंबिवलीतून दोन महागड्या दुचाकी चोरी असल्याची कबुली दिली. दुचाकींचे वाहन क्रमांक बदलून तो त्या वापरत होता. चांगला ग्राहक मिळाला की तो त्याची विक्री करत होता. काशीम कडून दोन दुचाकी, एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.काशीमने आतापर्यंत किती दुचाकी डोंबिवली परिसरात चोरल्या. त्या कोणाला विकल्या आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.

Story img Loader