लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या एक महिला हवालदाराच्या गळ्यातील मंगळसूत्र बुधवारी सकाळी एका सराईत चोरट्याने हिसकावून पळ काढला. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल होताच, पोलिसांनी २४ तासाच्या आत चोरट्याला अंबरनाथ येथून अटक केली.
प्रवीण प्रेमसिंग पवार (३०, रा. पंचशीलनगर, अंबरनाथ पूर्व) असे अटक चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, पूजा श्रीकांत आंधळे (२७) या कल्याण पूर्व भागात कुटुंबासह राहतात. त्या मुंबईतील ताडदेव पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कर्तव्य करतात.
हेहा वाचा… पाणी साचल्यास ठेकेदारांना होणार वीस हजारांचा दंड, ठाणे महापालिका आयुक्तांचा ठेकेदारांना इशारा
बुधवारी सकाळी ११ वाजता त्या कल्याण रेल्वे स्थानकात फलाट सात क्रमांकावर येऊन मुंबईत कार्यालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. पूजा लोकलच्या डब्यात चढल्या. त्या डब्यात चोरटा पवार हजर होता. लोकल सुरू होताच प्रवीण पवारने हवालदार पूजा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून धावत्या लोकलमधून फलाटावर उडी मारुन पळ काढला. लोकल सुरू झाल्याने त्या चोरट्याला पकडू शकल्या नाहीत.
हेही वाचा… ठाण्यातील सेवा रस्त्यांवर वाहनतळाची मोफत सुविधा, ठाणे महापालिकेची योजना
पूजा यांनी या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस अधिकारी अनिल जावळे यांनी तात्काळ रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात आरोपी फलाटावरुन पळत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्या चेहऱ्याची ओळख पटवली. तो अंबरनाथ भागातील असल्याचे पोलिसांना समजले. लोहमार्ग पोलिसांनी अंबरनाथ पूर्व भागात शोध मोहीम राबवून आरोपी प्रवीणला अटक केली.
त्याने मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून हवालदार पूजा यांचे ६५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने रेल्वे हद्दीत आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.