ठाणे : ठाणे येथील खोपट परिसरातील शिवसेना शाखेजवळ शनिवारी सकाळी एक वृक्ष उन्मळून पडले. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या रिक्षा आणि करावर वृक्ष पडल्याने त्याचे नुकसान झाले. वृक्ष पडल्यामुळे या भागात १५ ते २० मिनिटे वाहतूक कोंडी झाली होती.ठाणे येथील खोपट परिसरातील रस्ता कॅडबरी जंक्शनला जोडण्यात आलेला आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असते. या शिवाय येथून पाचपाखडी भागात जाण्यासाठीही येथून मार्ग आहे. या रस्त्यालगत शिवसेनेची शाखा आहे.

या शाखेजवळील एक वृक्ष शनिवारी सकाळी ९.४५ वाजता उन्मळून पडले. याच परिसरात अमित जोशी यांची रिक्षा आणि . विनल शहा यांची कार उभी करण्यात आली होती. या दोन्ही वाहनांवर हे वृक्ष पडले. यात रिक्षाच्या छताचे आणि मागील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारच्या बोनेटचे आणि पुढील काचेचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अशी माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

या घटनेची माहिती मिळताच उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पडलेले वृक्ष अग्निशमन दलाचे जवान, वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने कापून बाजूला करण्यात आले आहे. हे वृक्ष पडल्यामुळे अंदाजे १५ ते २० मिनिटासाठी वाहतूक कोंडी झाली होती, अशी माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

Story img Loader