ठाणे: शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर रात्रीच्या तसेच अनेकदा दिवसाही ट्रक तसेच अवजड वाहने उभे राहत असल्याने अनेकदा शहरांतर्गत वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येते. यावर उपाय म्हणून शहराच्या वेशीवर असलेल्या नॅशनल हायवेच्या जागेत खारेगाव येथे ट्रक टर्मिनस उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी लागणाऱ्या जागेचे हस्तांतरण करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून पत्रव्यवहारही पार पडला आहे. यामुळे येत्या काही दिवसात ट्रक टर्मिनस उभारण्याचे काम सुरू होणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीतून काही अंशी दिलासा मिळू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औद्योगिक वसाहतींमध्ये मालाची ने-आण करण्यासाठी सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. कंटेनर तसेच ट्रक मधील माल उतरवणे आणि चढविणे यांसाठी अनेकदा वाहन चालकांना मुक्काम करावा लागतो. मात्र अशा वेळी त्यांच्याकडे विशिष्ठ जागा नसल्याने काही मोठ्या रस्त्यांवर ही वाहने चालकांकडून उभी केली जातात. याच थेट फटका शहरांतर्गत वाहतुकीला बसतो. अवजड वाहनांनी रस्ता व्यापल्याने अनेकदा वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत असतो. यावर उपाय म्हणून त्यांच्यासाठी राज्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये ट्रक टर्मिनन्स उभारण्यात येत आहेत. शेकडो वाहनांच्या पार्किंगची क्षमता, शौचालय, आरामगृह, वाहने दुरुस्ती केंद्र यांसारख्या विविध सुविधा या ठिकाणी उभरण्यात येतात.

हेही वाचा… ठाण्यातील खासगी डाॅक्टर देणार पालिका रुग्णालयात सेवा

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती असून जेएनपीटी बंदर येथे पोहचण्यासाठी सर्व वाहने ठाण्यातूनच जाताना दिसून येतात. या वाहनांना उभे राहण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेकदा रस्त्यांच्या दुतर्फा ही वाहने उभी राहील्याने वाहतूक कोंडी होते. याबाबत भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा ट्रक टर्मिनल उभारणीचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर सर्व लोकप्रतिनिधींनी देखील सकारात्मक भूमिका घेत ट्रक टर्मिनल उभारणीसाठी कार्यवाही राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार ठाणे महापालिका प्रशासनाकडून नॅशनल हायवे प्रधिक्रणाशी समन्वय साधला जात असून जमीन हस्तांतरणासाठी पत्र व्यवहारही सुरू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्तांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही कालावधीत ठाणे जिल्ह्याच्या वेशिवरच ट्रक टर्मिनलची उभारणी झाल्यास शहरांतर्गत वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत.

मुंबई ठाणे वेशीवर नॅशनल हायवेच्या जागेत खारेगाव येथे ट्रक टर्मिनस आरक्षण असून, ट्रक वाहतुक ही बहुतांशी हायवेवरून होत असल्यामुळे हे आरक्षणाच्या जागेत ट्रक टर्मिनस विकसित करण्यास नॅशनले हायवेस महापालिका तर्फे प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सेक्टर क्र ३ मध्ये मॉडेला मिलच्या जागेवर पार्किंग आरक्षण दर्शविण्यात आले असून, जागा खाजगी मालकीची आहे. या आरक्षणाची जागा महापालिकेस हस्तांतरण करणेबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

सध्या ट्रक टर्मिनलची उभारणी कुठे – कुठे ?

पनवेलजवळील तळोजा औद्योगिक वसाहतीत २९ हजार ७८० हजार चौरस मिटर जागेत ट्रक टर्मिनन्स उभारले जात आहे. तसेच या व्यतिरिक्त ठाणे-बेलापूर रस्त्याच्या पूर्व बाजूला असलेल्या टीटीसी औद्योगिक वसाहतीसाठी यादवनगर, रबाडा येथे १२ हजार ५०० चौरस मिटर जागेत ट्रक टर्मिनल उभारले जात आहे.

ट्रक तसेच कंटेनर रात्री तसेच दिवसही रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. तर ट्रक चालकांना देखील योग्य सुविधा नसल्याने जिल्ह्याच्या वेशीवर ट्रक टर्मिनलची उभारणी गरजेची आहे. यासाठी ही मागणी करण्यात आली होती. याची कार्यवाही जलद गतीने व्हावी. – निरंजन डावखरे, आमदार

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A truck terminus has been planned to be set up at kharegaon on the national highway site at the entrance of thane dvr
Show comments