खासदारांच्या लेटलतीफ कारभारामुळे ठाणेकर रसिक ‘घायाळ’
नाटय़संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर ठाणेकरांना उत्तमोत्तम नाटय़विष्काराचा आस्वाद घेता यावा यासाठी मोठा गाजावाजा करीत आयोजित करण्यात आलेल्या संमेलन पूर्वारंभ सोहळ्याला आयोजकच तब्बल दोन तास उशिरा अवतरल्याने रसिकांसह कलावंतांचाही हिरमोड झाल्याचे चित्र शुक्रवारी मो.ह.विद्यालयाच्या पटांगणात पाहावयास मिळाले.
या पूर्वारंभ सोहळ्याचे पहिले पुष्प ‘संगीत कटय़ार काळजात घुसली’ या अजरामर कलाकृतीद्वारे गुंफण्यात येणार असल्याने ठाणेकर रसिकांची पावले सायंकाळी आपसूकच मो. ह. विद्यालयाच्या प्रांगणाकडे वळली. मात्र या सोहळ्याचे प्रमुख आयोजक आणि नाटय़ परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष खासदार राजन विचारे यांचा उशिरापर्यत कार्यक्रमस्थळी पत्ता नव्हता. अध्यक्षांची वाट पाहत समारंभस्थळी थांबलेले भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही या दिरंगाईला कंटाळून अखेर काढता पाय घेतला. विशेष म्हणजे, कार्यक्रमस्थळी अगदी नियोजित वेळी हजर झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी आणि मेधा भागवत यांनाही अध्यक्षांच्या या लेटलतीफ कारभारामुळे समारंभस्थळी तिष्ठत राहावे लागले.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या वतीने येत्या १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान ठाणे शहरातील विविध ठिकाणी ९६व्या नाटय़ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन दिमाखदार आणि अभूतपूर्व व्हावे यासाठी ठाण्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते सर्व ताकदीनिशी कामाला लागल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्याकडे आहे. त्यामुळे प्रत्येक सोहळा हा जणू आपल्या घरचा कार्यक्रम आहे, अशा पद्धतीने शिवसेनेच्या नेत्यांपासून शाखाप्रमुखांपर्यंत जो तो कामाला लागला आहे. या संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर ठाणेकरांना उत्तमोत्तम कार्यक्रमांची मेजवानी मिळावी यासाठी शुक्रवारपासून सलग आठवडाभर विविध नाटय़प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. या पूर्वारंभ शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता मो.ह.विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.
* नाटय़ परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष आणि प्रमुख आयोजक खासदार राजन विचारे यांचा सायंकाळी सात वाजले तर कार्यक्रमस्थळी पत्ता नव्हता.
* तब्बल दोन तासांच्या प्रतीक्षेनंतरही खासदार महाशय येत नाहीत, हे पाहून अक्षरश: त्रासलेले ठाण्याचे आमदार संजय केळकर कपाळावर आठय़ा आणतच कार्यक्रमस्थळावरून निघून गेले.
* अखेर सव्वासातच्या ठोक्याला अध्यक्ष महाराज कार्यक्रमस्थळी अवतरले आणि कार्यक्रम लगेच सुरू करण्यात आला.
* कार्यक्रमस्थळी येताच खासदार विचारे यांनी उपस्थितांची माफी मागून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र या लेटलतीफ कारभारामुळे प्रेक्षक मात्र मनोमन घायाळ झाल्याचे जाणवत होते.