ठाणे: मुंब्रा येथे एका भाजी विक्रेत्याची तीन जणांनी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली धक्का देऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तिघेही त्याच्याकडील पैसे जबरीने खेचून घेत होते. या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोहसीन शेख याला अटक केली असून त्याच्या दोन साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा >>> कोपरी रेल्वे पूल प्रकल्प तीन महिन्यात पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस

सुजीत गुप्ता (२६) असे मृताचे नाव असून तो मागील १० दिवसांपासून तो मुंब्रा येथील बाजारपेठेत टोमॅटो विक्रीचा व्यवसाय करत होता. रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास सुजीत हा बाजारपेठेत गेला असता मोहसीन आणि त्याचे साथिदार त्याच्याकडील पैसे खेचून घेत होते. यानंतर त्याने तात्काळ त्याच्या मित्राला याची माहिती फोन करून दिली. मित्र बाजारपेठेत गेला असता, सुजीत हा त्याठिकाणी आढळून आला नाही. तसेच त्याचा मोबाईल बंद होता. त्यानंतर सुजीतच्या मित्राने याची माहिती सुजीतचा भाऊ राजकुमार याला दिली.  राजकुमार मुंब्रा येथे आल्यानंतर ते सुजीतच्या काही मित्रांसह मुंब्रा पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळेस पोलीस ठाण्यात एका व्यक्तीच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

हेही वाचा >>> आनंदनगर सबवेचे गर्डर बसविण्याचे काम पूर्ण; ठाण्यातील वाहतूक सुरळीत

राजकुमार यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन मृतदेह पाहिला असता, तो मृतदेह सुजीतचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या कानातील सोन्याची बाळी आणि रोकडही गायब असल्याचे राजकुमार यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर याप्रकरणी हत्येची नोंद करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ मोहसीन शेख याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन अटक केली. पैसे खेचून घेत असताना सुजीत हा मुंब्रा येथील एका पाच मजली इमारतीच्या गच्चीवर गेला होता.  मोहसीन आणि त्याचे दोन साथिदारही त्याच्या मागे धावत गेले. त्यांनी सुजीत कडील रोकड आणि बाळी काढून घेतली. त्यानंतर त्याला गच्चीवरून धक्का दिला. खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्याच्या दोन साथिदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Story img Loader