कल्याण पूर्व विभागातील मलंग गड भागातील नेवाळी नाका येथे महावितरणच्या तंत्रज्ञाला नेवाळी पाडाच्या स्थानिक ग्रामस्थाने किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण करुन त्यांच्यावर लोखंडी वस्तुने हल्ला केला. या हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी होऊन त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मंगळवारी ही घटना नेवाळी पाडा गावात घडली. यासंदर्भात हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> ठाणे : कशेळी-काल्हेर भागात वाहतूक कोंडी ; बुधवारपासून विजेचा लपंडावही सुरू
सोमनाथ नाथा जाधव (रा. नेवाळी पाडा, मलंगगड, कल्याण) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. महावितरणच्या मलंग गड शाखा कार्यालयात कार्यरत तंत्रज्ञ एकनाथ तळपाडे हे मंगळवारी सकाळी नेवाळी नाका येथील कल्याण रस्त्यावरील रोहित्राला फ्यूज टाकण्याचे काम करत होते. आरोपी सोमनाथ जाधव याला पंधरा दिवसापूर्वी तंत्रज्ञ तळपाडे यांनी एक सेवा तार दिली होती. ही तार दिल्यानंतर काही दिवसात जळली. ही तार निकृष्ट होती. अशी तक्रार करत तंत्रज्ञ तळपाडे यांना आरोपी जाधव याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तांत्रिक दोषामुळे तार जळली असेल. त्यात आपला काही दोष नाही असे सांगत असताना ते ऐकून न घेता आरोपीने लाथाबुक्क्यासह धातुच्या टणक वस्तुने तंत्रज्ञ तळपाडे यांच्या डोक्यावर प्रहार केला.
हेही वाचा >>> ठाणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता विषयक उपक्रम
तंत्रज्ञ तळपाडे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तळपाडे यांच्या फिर्यादीवरून हिल लाईन पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या सरकारी कामात अडथळा, जीवघेणा हल्ला, शिवीगाळ व दमदाटी कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरिक्षक श्रीराम पडवळ या गुन्ह्याचा तपास करत आहेत. कर्तव्यावरील वीज कर्मचारी व कामगारांना दमदाटी, मारहाण हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा न आणता त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.