असेच एक उदाहरण जनकल्याण समितीच्या- डॉ. पटवर्धन रुग्णालय, पनवेलच्या बाबतीत घडले. मी एका मित्राला रुग्णालय दाखविण्यासाठी घेऊन गेलो. रुग्णालय पाहिल्यानंतर डायलिसिसच्या रुग्णांना सवलत देण्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची मदत केली. ते गृहस्थ सातत्याने अशी मदत करू शकतात, अशी माझी खात्री होती. फक्त त्यांचे दान योग्य कामासाठी खर्च होत असल्याचे दाखवून देण्याची गरज होती. मी त्या रुग्णालयाच्या सॉफ्टवेअरमध्ये वेगळा प्रोग्रॅम तयार करण्यास सांगितले. दरमहा किती डायलिसिस रुग्णांना मदत केली. त्यांचे नाव, पत्ते, दूरध्वनी क्रमांक, महिन्याचा एकूण खर्च, शिल्लक रक्कम याचा तपशील करून पुढील महिन्याच्या पाच तारखेपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना केल्या. रुग्णालयाने या सूचना तंतोतंत पाळल्या. त्यावेळी दरमहा सर्वसाधारणपणे २० हजार रुपये खर्च झाल्याचे दिसले. चार महिन्यांची स्टेटमेंट घेऊन त्या गृहस्थांना दाखवली, तर त्यांनी आणखी एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. मी दर पाच महिन्यांनी, पहिले पैसे संपले असे सांगून आणखी पैसे मागितले असते, तर ते मिळण्याची खात्री नव्हती. मात्र, केवळ पारदर्शक पद्धत अवलंबल्याने त्या गृहस्थांनी आतापर्यंत आठ लाख रुपयांची मदत केली. याच रुग्णालयाला अॅप्थलमॉलॉजीचे एक पूर्ण युनिट उभारण्यासाठी ठाण्यातील एक उद्योजक आणि सामाजिक भान असलेल्या एका ज्येष्ठ महिलेने १६ लाख रुपये दिले. देण्यामध्येही खूप मोठा आनंद असतो, याचा आनंद त्या घरातील दुसऱ्या, तिसऱ्या पिढीनेही घेतला.
मी ‘नाना पालकर स्मृती समिती’चे काम सुरू करून दीड वर्ष झाले तरी सर्व उपक्रमांना भरघोस मदत करणारे एक देणगीदार वारंवार विनंती करूनही वरील संस्था बघायला येण्याचा योग जुळून येत नव्हता. चार महिन्यापूर्वी मी त्यांना म्हटले, तुम्ही ‘नाना पालकर’ संस्था बघायला यायलाच पाहिजे. ते म्हणाले, ‘कर्वे सध्या व्यवसायाची स्थिती फार चांगली नाही आणि कुठे गेले की मला पटकन मी हे करतो असे म्हणण्याची सवय आहे. उद्या नाही जमले तर कर्ज काढून देण्याची वेळ येईल.’ मला वाटतं देणग्या जाहीर करून सरसकट ते न देणारे महाभाग आपण नेहमीच बघतो, पण एकदा देणगी देण्याचा संकल्प सोडला तर तो कर्ज काढूनही पूर्ण केला पाहिजे, असा विचार करणारे थोरही आहेत, अशांना माझे शतश: वंदन. उपरोक्त देणगीदारांनी हा विचार त्यांच्यापुरताच न ठेवता तो पुढील पिढीतही चालू राहील, असे बघितले.
जुलै महिन्यात एका गृहस्थांचा फोन आला. त्यांनी माझ्या उपक्रमासंबंधी ऐकले होते आणि त्यांना पसे देण्याची इच्छा होती. मी त्यांना जाऊन भेटलो. उपक्रम समजावून सांगितला. त्या दोन पती-पत्नींनी जनकल्याण समिती पूर्वाचल विकास प्रकल्पामधील चिपळूण येथे राहणाऱ्या नागालँडमधील मुलींच्या शिक्षणासाठी ६० हजार रुपये दिले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे खर्च मर्यादित ठेवले आहेत. त्यामुळे ते एवढी रक्कम दरवर्षी वेगवेगळ्या संस्थांना देऊ शकतात. या वर्षी रुपये ५० लाख हे सर्व लोकांनी पुढे होऊन दिले आहेत.
मला कोणाकडेही मागायला जावे लागले नाही, हे सांगूनही कोणाला खरे वाटणार नाही.
रिवद्र कर्वे -ravindrakarve1611@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा