कल्याण – अमेरिकेत नोकरीनिमित्त स्थायिक असलेला एका नागरिक आपल्या विवाहानिमित्त भारतात परतला आहे. तो कर्जत परिसरात राहतो. त्याने विवाहानिमित्त खरेदी केलेल्या वस्तू, अमेरिकन चार हजार डाॅलर असा एकूण चार लाख ७५ हजाराचा ऐवज असलेली पिशवी हा विदेशी नागरिक कर्जत लोकलमधून उतरून घेण्यास विसरला. या नागरिकाने ही माहिती रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी बदलापूर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये विसरलेली ही पिशवी उतरून घेतली. त्या नागरिकाला कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात बोलावून परत केली.
डिकाॅस्टा ॲन्थोनी असे या अमेरिकन निवासी नागरिकाचे नाव आहे. ते कर्जत परिसरात राहतात. विवाहानिमित्त ते भारतात परतले आहेत. विवाहानिमित्त मुंंबईत डिकाॅस्टा ॲन्थोनी यांनी सोन्याची अंगठी, कपडे खरेदी केले. खरेदीचे साहित्य एका पिशवीत घेऊन ते मुंबईतून कर्जत लोकलने कर्जत भागात परतले. लोकलमधून कर्जत येथे उतरून गेल्यानंतर त्यांना आपली महत्वाची पिशवी लोकलमध्येच विसरलो असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने रेल्वे पोलिसांना हेल्पलाईनवर संपर्क केला. आपली महत्वाचा ऐवज असलेली पिशवी कर्जत-सीएसएमटी लोकलमध्ये विसरली असल्याचे पोलिसांना सांगितले. लोकलच्या वेळापत्रकाप्रमाणे कर्जत लोकल तोपर्यंत बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाली होती. बदलापूर रेल्वे स्थानकात तैनात असलेल्या लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक के. एस. सूर्यवंशी, हवालदार पी. एल. जाधव यांना कर्जतकडून निघालेल्या सीएसएमटी दिशेकडील चौथ्या डब्यात एक काळी पिशवी विसरली आहे. ती ताब्यात घेण्याची सूचना पोलीस नियंत्रण कक्षाकडून करण्यात आली.
हेही वाचा >>>डोंबिवली एमआयडीसीतील नवीन काँक्रीट रस्त्याचे खोदकाम केल्याने प्रवाशांमध्ये संताप
कर्जत लोकल बदलापूर रेल्वे स्थानकात येताच उपनिरीक्षक सूर्यवंशी, जाधव यांनी संबंधित डब्यात चढून डिकाॅस्टा यांची मंचावर ठेवलेली पिशवी ताब्यात घेतली. तसा निरोप त्यांनी नियंत्रण कक्षाला दिला. पिशवीमध्ये चार हजार अमेरिकन डाॅलर ( चार लाख रूपये), सोन्याची अंगठी, कपडे, पारपत्र, आयफोन, चाॅकलेटची पाकिटे होती. या ऐवजाची एकूण किंमत चार लाख ७५ हजार रूपये होती. उपनिरीक्षक सूर्यवंशी हा ऐवज असलेली पिशवी घेऊन कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोहचल्या. साहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एस. देशमुख यांनी पिशवी हरवलेल्या डिकाॅस्टा यांना लोहमार्ग पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पंचांसमक्ष त्यांची ऐवजाची पिशवी त्यांना परत केली. याबद्दल ॲन्थोनी यांनी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले.