ठाणे: महापालिका क्षेत्रातील चौकांमध्ये नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी झेब्रा क्राॅसिंगचे पट्टे रेखाटण्यात आले आहेत. त्यासाठी पांढरा-काळ्या रंगाचा वापर करण्यात येत होता. परंतु हे पट्टे नागरिकांना दिसून येत नसल्यामुळे ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी आता त्याचा रंग बदलला आहे. पांढरा-काळ्या रंगाऐवजी आता पांढरा-लाल रंगाचा वापर करण्यात येत असून या रंगाचे पट्टे तीन हात नाका चौकात प्रायोगिक तत्वावर रेखाटण्यात आले आहेत. या बदलामुळे झेब्रा क्राॅसिंग नियमाची अंमलबजावणी होत असल्यामुळे शहराच्या इतर भागातही अशाप्रकारचे बदल करण्याचा विचार सुरू असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
ठाणे महापालिका क्षेत्रातून मुंबई-नाशिक आणि मुंबई-अहमदाबाद असे दोन महामार्ग जातात. या मार्गावरील चौकातून शहराच्या अंतर्गत भागात रस्ते जातात. शिवाय, शहरातील अंतर्गत भागातही प्रमुख चौक आहेत. येथून नागरिकांना रस्ता ओलांडता यावा आणि त्यांचे अपघात होऊ नयेत, यासाठी चौकांमध्ये झेब्रा क्राॅसिंगचे पट्टे रेखाटण्यात आले आहेत. त्यासाठी पांढरा-काळ्या रंगाचा वापर करण्यात येतो. या पट्ट्यांवर किंवा त्यापुढे वाहने उभी केल्यास संबंधित वाहनाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. प्रत्यक्षात मात्र झेब्रा क्राॅसिंग नियमाचे फारसे पालन होताना शहरात दिसून येत नाही. असे असतानाच, ठाणे महापालिका आणि ठाणे वाहतूक पोलिसांनी आता झेब्रा क्राॅसिंग पट्ट्यांसाठी पांढरा-काळ्या रंगाऐवजी आता पांढरा-लाल रंगाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तीन हात नाका चौकात प्रायोगिक तत्वावर करण्यात आली आहे.
या संदर्भात ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी रंग बदलण्यामागेचे कारण स्पष्ट केले. पांढरा-काळा हा रंग अधिक गडद नसल्यामुळे ते दिसून येत नाहीत. यामुळे त्याचा वापर कमी होत असल्याने रंग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. झेब्रा क्राॅसिंग पट्ट्यांसाठी पांढरा-काळ्या रंगाऐवजी आता पांढरा-लाल रंगाचा वापरण्यात येत आहे. पांढरा-लाल रंग गडद असून यामुळे झेब्रा क्राॅसिंगचे पट्टे दिसून त्याच्या नियमाचे पालन होईल. या रंगाचे पट्टे तीन हात नाका चौकात प्रायोगिक तत्वावर रेखाटण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. या बदलामुळे झेब्रा क्राॅसिंग नियमाची अंमलबजावणी होत असल्यामुळे शहराच्या इतर भागातही अशाप्रकारचे बदल करण्याचा विचार सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.