कल्याण-मुरबाड रस्त्यावरील म्हारळ गावातील सूर्यानगर मध्ये शुक्रवारी पहाटे एका घराचे छत कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या महिलेची मुलगी छताचा राडारोडा अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाली. तिच्यावर शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.रंजना उमाजी कांबळे (३८) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांची प्रज्ञा (१८) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. रंजना यांची अन्य दोन मुले राज (१६), प्रीती (२०) दुसऱ्या खोलीतील शय्यागृहात होती म्हणून थोडक्यात बचावले.
हेही वाचा >>>ठाणे : महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात… बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य
सूर्यानगर भागात चाळीवर बांधकाम करुन त्यात रहिवासी राहतात. २५ वर्षापासुनच्या चाळी या भागात आहेत. अशाच एका चाळीत रंजना आपल्या मुलांसह राहतात. छत कोसळले त्या भागात रंजना आणि प्रज्ञा झोपल्या होत्या. शुक्रवारी पहाटे गाढ झोपेत असताना अचानक छताचा भोग कोसळून मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील रहिवासी जागे झाले. छताच्या राडारोड्याचा फटका रंजना यांना जोराने बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या जवळ झोपलेल्या प्रज्ञाच्या अंगावर राडारोडा पडला. तिलाही जखमा झाल्या आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला मुंबईत उपचारासाठी नेण्यात आले आहे.
हेही वाचा >>>ठाणे जिल्हा बनतोय बिबट्याचे अधिवास क्षेत्र?
म्हारळ गावातील ग्रामपंचायत सदस्य नीलेश देशमुख, विवेक गंभीरराव, किशोर वाडेकर यांनी तात्काळ हालचाल करुन घरातील राडारोडा बाहेर काढला. जखमी प्रज्ञाला मुंबईत उपचारासाठी पाठविण्यात आले. रंजना मजुरी करुन मुलांची उपजीविका करत होत्या. त्यांच्या पतीचे एक वर्षापूर्वी निधन झाले आहे.म्हारळ परिसरातील दगडखाणींमध्ये सुरूंग स्फोट केले जातात. त्याचे दणके चाळींना बसतात. त्यामुळे अशा घटना दरवर्षी घडतात, असे रहिवाशांनी सांगितले.