कल्याण पूर्व येथील चिंचपाडा गावात एका बंगल्यात मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला. यावेळी आग विझविताना चार जण गंभीररित्या भाजले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा गावातील आई बंगल्यात मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या बंगल्यातील निवासी म्हात्रे कुटुंबीय गाढ झोपेत होते. आगीच्या झळा लागताच म्हात्रे कुटुंबीय जागे झाले. तोपर्यंत आगीने घरात रौद्ररुप धारण केले होते. आगीतून घरा बाहेर कसे पडायचे असा प्रश्न म्हात्रे कुटुंबीयांसमोर उभा राहिला.
आग विझविण्याचा प्रयत्न म्हात्रे कुटुंबीयामधील मुलगा व त्यांच्या इतर तीन सदस्यांनी केला. ते प्रयत्न अपुरे पडले. यामध्ये जयश्री भरत म्हात्रे महिलेचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आग विझविणारे घरातील चारही जण आगीच्या झळांनी भाजले. आगीच्या ज्वाला, धुरातून वाट काढत ते बाहेर पडले. त्यामुळे बचावले.
या दुर्घटनेत मृत पावलेल्या जयश्री यांचे पती भरत महात्रे उत्तर भारतात देव दर्शनाला गेल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. शेजाऱ्यांनी ही माहिती अग्निशमन दलाला दिली. जवान घटनास्थळी पोहचताच आग इतरत्र भडकणार नाही याची खबरदारी घेत प्रथम आग विझविली. त्यानंतर बंगल्याला लागलेली आग आटोक्यात आणली. यासंदर्भात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जयश्री म्हात्रे यांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आगीचे नक्की कारण कळू शकले नाही. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता जवानांनी व्यक्त केली