शहापूर : तालुक्यातील पटकीचा पाडा येथे रस्त्याअभावी एका वीस वर्षीय महिलेची रानातील पाय वाटेवरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिला व बाळ सुखरूप आहेत. याप्रकारामुळे तालुक्यातील आदिवासी पाड्यांमधील असुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तालुक्यातील पटकीचा पाडा येथून सुमारे २५ किमी अंतरावर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. कसारा ते वेळूकपर्यंत रस्ता आहे. मात्र पटकीचा पाडा ते वेळूक हे किमान चार ते पाच किमी अंतराचा रस्ताच नसल्याने पटकीच्या पाड्यातील गंभीर रुग्णांना डोलीशिवाय पर्याय नसतो. २०१८ ला मंजूर झालेला वेळूक ते पटकीचा पाडा हा रस्ता अजूनही झालेला नाही. पटकीचा पाडा येथील प्रणाली वाघे या वीस वर्षीय गर्भवती महिलेला रविवारी सकाळी प्रसूती वेदना होऊ लागल्या. पण, रस्ता नसल्याने तिला वेळूकपर्यंत डोलीत आणि तेथून पुढे कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अन्य वाहनातून नेण्यात येणार होते. परंतु पटकीचा पाडा ते वेळूक या रानातील पायवाटेवरच प्रणालीची प्रसूत झाली. सोबत असणाऱ्या महिलांनी प्रणालीला सावरले आणि तिला धीर दिला.

हेही वाचा – ठाणे : येऊर परिसरात भाजपने राबविले काच, प्लास्टिकमुक्त अभियान; ३० मोठ्या पिशव्या भरून कचरा, काच व प्लास्टिक जमा

हेही वाचा – ठाण्यात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम शिवसेनेकडून हायजॅक

पटकीच्या पाड्यातील ग्रामस्थांनी गावपड्यांवर काम करणाऱ्या ‘आशा’ सेविकांना याबाबत माहिती दिल्याने त्यांनी वेळूक येथे वाहन उपलब्ध केले होते. त्या वाहनातून प्रणालीला कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिच्यावर योग्य उपचार केल्यानंतर प्रसूत महिला व बाळ दोघांची प्रकृती सुखरूप असल्याचे तेथील डॉ. सुवेदीका सोनवणे यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman gave birth in the forest due to lack of road in patki pada ssb
Show comments