ऑनलाइन व्यवहारातून महिलेची तीन लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. बँकेचे ऑनलाइन व्यवहार करत असताना कल्याण पश्चिमेकडील रामबागेत राहणाऱ्या एका महिलेच्या बँक खात्यांमधून भामट्याने नऊ व्यवहारांमधून एक ते दोन मिनिटांच्या अंतराने तीन लाख सात हजार रूपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
कल्याण पश्चिमेतील रामबाग गल्ली क्रमांक पाच मधील मनीषा सोसायटीत रिना समीर दत्ता (६१) या गृहिणी राहतात. बँक व्यवहारासाठी त्या स्टेट बँकेचे योनो उपयोजन वापरतात. घरातून ऑनलाईन व्यवहार करत असताना, रिना यांना मोबाईलवर आपला मोबाईल क्रमांक या जुळणीवर नोंदणीकृत करा, असा संदेश आला. बँकेकडून हा संदेश आला असेल म्हणून त्यांनी ती जुळणी (लिंक) उघडली. त्या जुळणीवर बँक अधिकाऱ्याचा मोबाईल क्रमांक दिसत होता. रिना यांनी त्या मोबाईलवर संपर्क साधला. समोरील भामट्या इसमाने आपण ‘तुम्हाला एक जुळणी पाठवतो. ती फक्त उघडा. तुम्हाला जो ऑनलाईन व्यवहाराचा गुप्त संकेतांक (ओटीपी) येईल तो तुम्ही मला द्या. म्हणजे तुमचे योनो उपयोजन तात्काळ सुरू होईल’, असे सांगितले.
बँकेचा अधिकारी आपल्याशी बोलतोय असे वाटून रिना यांनी गुप्त संकेतांक समोरील भामट्याला दिला. त्यानंतर काही क्षणात रिना दत्ता यांच्या कॅनरा बँक, स्टेट बँकेमधील खात्यांमधून नऊ व्यवहारांमध्ये भामट्याने तीन लाख सात हजार रूपये काढून घेतले. या व्यवहारांचे लघुसंदेश रिना यांना मोबाईलवर आले. त्यांनी आपण पैसे काढण्याचे व्यवहार केले नसताना, पैसे काढले कोणी असा संशय आला. त्यांनी तात्काळ दोन्ही बँकांमध्ये धाव घेतली. तेथे त्यांना आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. रिना यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणाची तक्रार केली. या तक्राराच्या आधारे पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून घेतला. हे प्रकरण अधिकच्या तपासासाठी सायबर गुन्हे शाखेकडे पाठविण्यात आले. स्थानिक पोलीस अधिकारी श्रीनिवास देशमुख, सायबर पोलीस या प्रकरणाचा समांतर तपास करणार आहेत.
मोबाईलवर कोणतीही जुळणी, समोरील व्यक्तिने आपल्या बँक व्यवहाराचा गुप्त संकेतांक मागितला तरी देऊ नका. आपली फसवणूक होऊ शकते, असे सतत ग्राहकांना सांगुनही अनेक ग्राहक या सूचनांचे पालन करत नाहीत. त्यामुळे अशी फसवणूक होते, असे एका बँक अधिकाऱ्याने सांगितले. ऑनलाईन व्यवहार करताना प्रत्येक ग्राहकाने समोरील व्यक्तिीची खात्री केल्याशिवाय त्याच्या बरोबर कोणत्याही व्यवहार, गुप्त संकेतांक क्रमांकाविषयी बोलू नये, असे आवाहन बँक अधिकाऱ्याने केले.