कल्याण- टिटवाळा येथील एक महिला चप्पलला चिखल लागला म्हणून पुराचा ओघ असलेल्या भातसा नदी पात्रात चप्पल धुण्यासाठी उतरली. पुरामुळे नदी लगतची जमीन भुसभुशीत झाली असल्याने तिचा पाय घसरून ती नदीत पडली आणि पुराच्या पाण्यात वाहून जाऊ लागली. त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांनी ओरडा केल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी नदी पात्रात उड्या घेऊन वाहून चाललेल्या महिलेला वाचविले.
कल्याण तालुक्यातील गरसे गाव हद्दीत ही घटना घडली. टिटवाळा येथे राहणाऱ्या रेश्मा जाधव कुटुंबासह टिटवाळा येथे राहतात. त्या सकाळी शहापूर येथील नातेवाईकांकडे गेल्या होत्या. संध्याकाळी त्या मोटार कारने नातेवाईकां सोबत टिटवाळा येथे घरी परतत होत्या. गरसे गावा जवळ भातसा नदीचे पात्र अरुंद आणि नदी पात्रातील पुराचे पाणी पाहण्यासाठी काही वेळ थांबण्याचा विचार रेश्मा आणि नातेवाईकांनी केला. पुलावर फिरत असताना रेश्मा यांच्या चप्पलला चिखल लागला. त्यांना चालणे अवघड झाले. चप्पल धुण्यासाठी त्या पुलावरून उतरून नदी किनाऱ्या जवळ चप्पल धुऊ लागल्या. गेल्या १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी पात्राची जमीन भुसभुशीत झाली आहे. चप्पल धुताना रेश्मा जाधव यांचा पाय किनाऱ्या जवळील चिखलात रुतून त्या नदी प्रवाहात तोल गेल्याने पडल्या. वाहून जाऊ लागल्या. त्यांच्या सोबत असलेले रवी खुताडे व इतर नातेवाईकांना पोहता येत नसल्याने त्यांनी ओरडा केला. गरसे गावातील रहिवाशांना आवाहन करून रेश्मा वाचविण्याचे आवाहन केले. गावातील तरबेज पोहणारे सात ते आठ जण नदी काठी येऊन त्यांनी नदी पात्रात उडया घेतल्या. वाहत चाललेल्या रेश्माला चारही बाजुने घेर धरून पकडले. त्यांना जीवरक्षक साधनांच्या साहाय्याने नदी किनारी आणले. त्या सुस्थितीत होत्या, पण त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
गरसे गावचे पोलीस पाटील शशिकांत दिवाने, जीवरक्षक पथकाचे प्रदीप गायकर यांच्या पथकाने महिलेचा जीव वाचविण्यात महत्वाची कामगिरी केली.