ठाणे : ठाणे ते कळवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकल डब्यामध्ये एका तरूणावर धारदार ब्लेडने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोमवारी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मुंब्रा येथे राहणारा १८ वर्षीय तरूण कल्याण धिम्या लोकलने शनिवारी रात्री अपंगांच्या डब्यामधून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्याशी एका व्यक्तीने किरकोळ कारणावरून वाद घातला. ठाणे आणि कळवा स्थानका दरम्यान लोकल आली असता, त्या व्यक्तीने त्याच्या हातातील ब्लेडने तरूणाच्या नाका आणि डोळ्याजवळ हल्ला केला. तरूण मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. सोमवारी त्या तरूणाने ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.