लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: येथील पश्चिमेतील जुनी डोंबिवली भागात पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांनी याच भागातील एका तरुणाला बेदम मारहाण केली. नेमाडे गल्ली येथे बुधवारी रात्री साडे सात वाजता हा मारहाणीचा प्रकार घडला.
नीलेश शिंगारे (२५, रा. विपुल निवास, टेलकोसवाडी, डोंबिवली) असे तक्रारदाराचे नाव आहे. रोहित जोशी (रा. जनक निवास, जुनी डोंबिवली), शुभम शिर्के (रा. खंडोबा मंदिर, जुनी डोंबिवली) अशी आरोपी तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, बुधवारी रात्री भोजन झाल्यानंतर तक्रारदार नीलेश घराबाहेर पडले होते. नेमाडे गल्ली भागात एका आईसक्रिम केंद्राच्या ठिकाणी उभे राहून ते आईसक्रिम खात होते. यावेळी रात्रीचे साडे अकरा वाजले होते. याच वेळी तेथून आरोपी रोहित, शुभम चालले होते. त्यांनी नीलेशला पाहताच आपला म्होरा त्याच्या दिशेने वळविला आणि नीलेशला तू काय भाई झाला आहेस का रे, असे बोलून जुन्या भांडणाचा राग मनात धरुन काचेचा ग्लास नीलेशच्या डोक्यात मारला. त्याला बेदम मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नीलेशला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. नीलेशच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही तरुणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.