कल्याण : कल्याण पूर्व येथील अडवली गावात एका तरुणाची हत्या करून मारेकऱ्यांनी मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची घटना गुरुवारी उघडकीला आली आहे. हा प्रकार कोणाच्या निदर्शनास येऊ नये . मृतदेह पाण्यावर तरंगू नये म्हणून मारेकर्यांनी मृतदेहाच्या गळ्यात अवजड दगड बांधला होता. परंतु मृतदेह गुरुवारी सकाळी पाण्यात तरंगू लागल्याने या तरुणाच्या मृतदेहाची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली.
परिसरातील रहिवाशांनी या मृतदेहाची ओळख पटवली. चंद्रप्रकाश लोवंशी असे या तरुणाचे नाव आहे. तो गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होता. चंद्र प्रकाश याच्या मानेवर आणि पाठीवर धारदार हत्याराने वार करण्यात आले आहेत. मानपाडा पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला आहे. या तरुणाची हत्या का व कोणी केली याचा तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने सुरू केला आहे.
हेही वाचा…कल्याणमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांना लुटले
तरुणाचा मृतदेह सापडलेल्या विहीर परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. पूर्व वैमनस्य, आर्थिक देवाण-घेवाण, किंवा प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील सबळ पुरावे उपलब्ध झाल्याशिवाय अंतिम निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.