बदलापूर : राज्यात अवकाळीचे वातावरण असून त्याचा फटका रविवारी मुरबाड तालुक्यातील टोकावडे आणि धसई भागातील शेतकऱ्यांना बसला. रविवारी सायंकाली गारांसह अवकाळी पावसाने तालुक्यात हजेरी लावली. यावेळी सुमारे दीड तास झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले.

धसईजवळील अल्याणी गावातील एका तरूणीचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तर तरूणीचे वडिलही यावेळी जखमी झाले. या पावसात आंबा, कडधान्य आणि भाजीपाल्याचेही नुकसान झाले.

एप्रिल महिन्यात वातावरणातील मोठे बदल अनुभवास येत आहे. पहिल्या आठवड्यात तापमानाने उचांकी पातळी गाठली असताना ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मुरबाड तालुक्यात झाली. मुरबाड तालुक्यातील धसई परिसरात तापमान ४३ अंश सेल्सियसवर गेले होते. विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक तापमान असताना त्यानंतर मुरबाडच्या धसईत सर्वाधिक तापमान होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात याच अवकाळीचा फटका बसला होता. त्यानंतर पुन्हा याच भागातील तापमान वाढले.

रविवारी राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यानुसार रविवारी ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यात अवकाळी पाऊस कोसळला. सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील धसई, टोकावडे या भागात पावसाला सुरूवात झाली. अवकाळीप्रमाणे पावसाने आपले रंग दाखवले. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी गाराही कोसळल्या. या दरम्यान अल्याणी गावातील अठरा वर्षीय रवीना सांडे ही तीचे वडील राजाराम सांडे यांच्यासोबत धसईकडे प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर वीज पडली. यावेळी त्यांना तात्काळ टोकावडे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे तपासणीअंती रविना या तरूणीला डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेत तिचे वडिल राजाराम सांडे हेसुद्धा जखमी झाले आहेत.

आठवडाभरापूर्वी ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गारांसह अवकाळी पाऊस पडला होता. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळेही जिल्ह्यातील फळबागांना मोठा फटका बसला होता. शहापूर, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले होते. रविवारी मुरबाडच्या टोकावडे परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी काढणीला आलेले कडधान्य आणि भाजीपालाही खराब झाला आहे.