बारमध्ये धक्का लागल्याच्या क्षुल्लक वादातून झालेल्या हाणामारीत 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बदलापूरातील हेंद्रेपाडा भागात समोर आली आहे. सिद्धांत उर्फ सनी सरोज असे मृत तरुणाचे नाव असून हेंद्रेपाडा येथील सी नाईन बार ऍंड रेस्टॉरंटमध्ये हा धक्काबुक्कीचा प्रकार घडला. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा भागात असलेल्या सी नाईन बार अँड रेस्टॉरंटमध्ये शनिवारी रात्री हा प्रकार घडला. सिद्धांत त्याच्या मित्रांसह या बारमध्ये दारू पिण्यासाठी गेला होता. त्यावेळी बाजूच्या टेबलवर दारू पिण्यासाठी बसलेल्या सहा अनोळखी इसमांपैकी एकाचा धक्का लागल्याने सिद्धांत याने त्या इसमाला व्यवस्थित बसण्याचा सल्ला दिला. मात्र त्याचा राग आल्याने एका इसमाने हॉटेलच्या आतच सिद्धांतला मारहाण सुरू केली. त्यावेळी हॉटेलमधील कर्मचारी आणि इतरांनी वाद थांबवला. मात्र हॉटेलच्या बाहेर पडताच पुन्हा सिद्धांत याला काही तरूणांनी घेरले. पुढे या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत सिद्धांत सरोज गंभीर जखमी झाला. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे राहुल पांचाळ, आदित्य मयेकर, अरूण वैद आणि नबी हिना शेख या चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्ता गावडे यांनी दिली आहे. तर अक्षय वैती आणि सचिन कबुतर या दोघांची नावे समोर आली आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती गावडे यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे बदलापुरात एकच खळबळ उडाली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A youth died in badlapur in fight over a minor issue asj