डोंबिवलीतील एका हरहुन्नरी तरुणाने १५० दिवस दररोज २१ किलोमीटर धावून विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा निर्धार केला आहे. हा निर्धार पूर्ण करण्यासाठी हा तरुण दररोज कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील घरडा सर्कल जवळील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात २१ किलोमीटर न थांबता अडीच तास सकाळच्या वेळेत धावत आहे.
सावळाराम महाराज क्रीडा संकुलात दररोज पहाटे पासून डोंबिवलीतील अनेक रहिवासी फिरण्यासाठी येतात. फिरणे झाल्यानंतर निघून जातात. या फिरणाऱ्यांमध्ये काहीही न बोलता एक तरुण काही दिवसांपासून क्रीडासंकुलातील अर्धा किमी लांबीच्या गोलावर पथावर कोणाशीही संवाद न धावता एकदा मैदानात उतरल्यावर सलग अडीच तास धावत आहे. सकाळी सात ते साडे नऊ वेळेत तो आपला धावण्याचा सराव पूर्ण करतो. सतत धावण्या मागील रहस्य काय असा प्रश्न या तरुणाला केल्यानंतर त्याने आपणास विश्वविक्रम करायचा आहे असे सांगितले.
८४ दिवस धावणार
सावळाराम क्रीडासंकुलाचे भौगोलिक क्षेत्र १९ एकर आहे. या क्रीडासंकुलातील गोलाकर पथ ५२० मीटरचा आहे. या पथावर (जॉगिंग ट्रॅक) विशाख दररोज ४१ फेऱ्या मारतो. विश्व विक्रम नोंदीसाठी विशाखने जीपीएस प्रणालीचा वापर केला आहे. आपण धावतो त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पंच नियुक्त केले आहेत. एक नोंदणी वही सोबत असते. जीपीएस प्रणालीमुळे आपण डोंबिवली परिसरात कोठेही धावलो तरी त्याची नोंद उपग्रहद्वारे होत असते. २३ मेपासून सावळाराम महाराज क्रीडासंकुलात आपण धावतो. बुधवार आपला धावण्याचा ६६ वा दिवस आहे. ८४ दिवस अजून आपणास धावायचे आहे, असे विशाखने सांगितले.
हरहुन्नरी तरुण
विशाख कृष्णस्वामी असे या तरुणाचे नाव आहे. तो २८ वर्षाचा आहे. डोंबिवलीतील स्टार कॉलनीत तो कुटुंबीयांसह राहतो. रामचंद्रनगर मधील मॉडेल इंग्लिश शाळेत त्याने दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केला. एमआयडीसीतील माॅडेल महावि्यालयातून त्याने एम. कॉम. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. तो एका विमा कंपनीत नोकरी करतो. चालणे, धावणे हा शरीर सुदृढतेचा उत्तम व्यायाम आहे. हे कळल्यापासून तो धावणे या प्रकाराकडे मागील पाच वर्षापासून वळला. बूट घालून, बूट न घालता धावणे असे अनेक प्रयोग तो धावताना करतो. मागील वर्षी बंगळूरू येथे झालेल्या मॅरेथाॅन स्पर्धेत विशाखने दुसरा क्रमांक पटकावला होता. तेव्हापासून आपण धावण्याचे विविध विक्रम करायचे ठरविले. पायात बूट न घालता सलग २१ दिवस धावण्याची अर्ध मॅरेथाॅन स्पर्धा त्याने पूर्ण केली आहे. कितीही अंतराचे महत्वपूर्ण टप्पे आपण पूर्ण करू शकतो असा आत्मविश्वास विशाखला आल्याने त्याने सलग १५० दिवस २१ किलोमीटर धावून विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा निर्धार केला आहे. या कालावधीत तो तीन हजार १५० किलोमीटर धावणार आहे. त्याचा हा निर्धार पूर्ण झाल्यानंतर विशाखची नोंद विश्व विक्रम यादीत होणार आहे.
१५० दिवसाचा उपक्रम पूर्ण झाल्यानंतर विशाखने डोंबिवली ते नेपाळ अकराशे किमीचे अंतर ११ दिवसात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. सतत धावण्याचा सराव सुरू असल्याने त्याला विविध प्रकारच्या धावण्याच्या आव्हानात्मक स्पर्धा खुणावू लागल्या आहेत. विशाख विश्वविक्रमासाठी धावतोय हे कळल्यापासून डोंबिवलीतील रहिवाशांनी त्याला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे.
समाज माध्यमांचा वाढता प्रभाव, बैठी कामे, घरून काम करण्याची नवीन कार्यालयीन पध्दत. त्यामुळे चालणे हा प्रकार थांबला आहे. ठप्प पडलेल्या या जीवन पध्दतीमुळे अनेक व्याधींनी नागरिक बाधित होत आहेत. शरीर सुदृढतेसाठी चालणे, धावणे हा उत्तम व्यायाम आहे. हा संदेश समाजात देण्यासाठी आपण धावत आहोत. – विशाख कृष्णस्वामी ,धावपटू