डोंबिवली – आपणास अर्धवेळ नोकरी देतो, असे आमिष दाखवून येथील टिळकनगर भागातील एका तरूणाची तीन भामट्यांनी गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत ऑनलाईन व्यवहारातून आणि माध्यमातून नऊ लाख ८७ हजार रूपयांची फसवणूक केली आहे.सुमीत ललित वार्ष्णेय (२८) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो नोकरी करतो. शायला, प्रियंका, पवनकुमार अशी आरोपींची नावे आहेत. टिळकनगर पोलीस ठाण्यात सुमीत यांनी तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी सांगितले, ऑक्टोबरमध्ये आरोपींनी तक्रारदार सुमीत यांच्याशी व्हाॅट्सअप, टेलिग्राम माध्यमातून संपर्क साधण्यास सुरूवात केली. सुमीतला अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखविले. सुमीत सध्या नोकरी करत आहे. नोकरी व्यतिरिक्त अर्धवेळ काम करण्याची संधी मिळते म्हणून भामट्यांच्या बोलण्यावर सुमीतने विश्वास ठेवला.
हेही वाचा >>>मेट्रो कारशेडच्या मार्गात नवा अडथळा; घरे बाधित होणार असल्याने विरोध
आरोपींनी सुमीतला विविध साधने पाठवून ते टप्पे पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले. ते टप्पे पूर्ण करत असताना आरोपींनी सुमीतकडून टप्प्याने एकूण नऊ लाख ८७ हजार रूपये वसूल केले. ही रक्कम त्यांनी ऑनलाईन माध्यमातून वसूल केली. टप्पे पूर्ण केल्यानंतर सुमीत आरोपींकडे नोकरीची मागणी करू लागला. त्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन नंतर संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. आपली ऑनलाईन माध्यमातून भामट्यांनी फसवणूक केली म्हणून तक्रारदाराने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.