डोंबिवली: आम्ही उभे असताना तू आमच्या जवळ फटाके का फोडतोस, असे प्रश्न करून चार जणांनी रविवारी रात्री एका तरूणाला बेदम मारहाण केली. शस्त्राने एकाने चेहऱ्यावर हल्ला केल्याने तरूणाला गंभीर दुखापत झाली आहे. ९० फुटी रस्त्यावरील मोहन सृष्टी इमारतीसमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला.
सकरूद्दीन शेख, मिथीलेश लोधी, राजू, रहिम अशी आरोपींची नावे आहेत. बबलू चव्हाण (२२) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो पाणी विक्रीचा व्यवसाय करतो. तो पत्रीपुलाजवळील हनुमाननगर भागात राहातो. बबलू हा ९० फुटी रस्त्यावरील मोहन सृष्टी इमारती समोरील रस्त्यावर फटाके वाजवित होता. त्या रस्त्यावर चारजण उभे होते. इथे फटाके वाजवू नकोस असे चौघांनी त्याला सांगितले. परंतु, बबलू त्यांचे ऐकत नव्हता.
हेही वाचा… स्वच्छता गृहांमध्ये फेरीवाले ठेवतात साहित्य; डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रकार
फटाका अंगावर उडाला तर आम्ही जखमी होऊ असे सांगुनही बबलू ऐकत नव्हता. यामुळे चौघांनी त्याला बेदम मारहाण केली. सकरूद्दीन शेख याने शस्त्राने बबलूच्या चेहऱ्यावर हल्ला केला. त्यामुळे त्याच्या चेहऱ्याला दुखापती झाल्या आहेत. बबलूने दिलेल्या तक्रारीच्या आधारे टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.