कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांच्या देखभालीसाठी कोट्यवधीचा निधी असुनही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. वाहन चालकाचे बळी जात आहेत. या सर्व प्रकाराला पालिका प्रशासन जबाबदार असल्याने आयुक्त, शहर अभियंत्यावर गुन्हे दाखल करा, या मागणीसाठी मंगळवारी आम आदमी पक्षाच्या कल्याण डोंबिवली शाखेतर्फे कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथे आंदोलन करण्यात आहे.
कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावर गेल्या आठवड्यात एका दुचाकी स्वाराचा खड्डा चुकविताना मृत्यू झाला. अशा दुर्देवी घटना दरवर्षी घडतात. हे माहिती असुनही पालिका अधिकारी पावसाळ्यापूर्वी आणि नंतर रस्ते सुस्थितीत ठेवण्याची काळजी घेत नाहीत, असा प्रश्न करुन ‘आप’चे कल्याण डोंबिवली विभागाचे अध्यक्ष ॲड. धनंजय जोगदंड यांनी पालिका ही भ्रष्टाचाराचा अड्डा झाली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे रस्त्यावरील खड्डे प्रवाशांच्या नशिबी दरवर्षी येत आहेत, अशी टीका केली.
हेही वाचा >>> बदलापूर मेट्रो, उड्डाणपुल, सॅटिस प्रकल्पांना गती मिळणार; मुखमंत्र्यांचा हिरवा कंदील
गुणवत्तापूर्ण रस्ते ठेकेदार नेमण्यात पालिका प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करते. कुचकामी ठेकेदार पालिका हद्दीत रस्ते बांधणी, खड्डे भरणीची कामे करतात. त्यामुळेच इतर शहरांपेक्षा कल्याण डोंबिवली क्षेत्रात दरवर्षी सर्वाधिक खड्डे पडतात. इतर पालिका हद्दींमध्ये असा प्रकार कधी होत नाही, असे ॲड. जोगदंड यांनी सांगितले. पालिका हद्दीतील सर्व रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या खड्ड्यांमुळे पडून अनेक दुचाकी स्वार, सायकल स्वार जखमी होत आहेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हे प्रकार होत आहेत, असे ॲड. जोगदंड यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांनी पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
“प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेे दरवर्षी कडोंमपा हद्दीत खड्डे पडतात. निकृष्ट पध्दतीने काम करणारे होयबा ठेकेदार रस्ते, खड्डे कामासाठी नेमले जातात. त्यामुळे इतर पालिकांपेक्षा खड्ड्यांमुळे कल्याण डोंबिवली पालिका सर्वाधिक बदनाम होते. हे आता थांबले पाहिजे. यासाठी खड्ड्यांना जबाबदार धरुन जोपर्यंत आयुक्त, शहर अभियंता यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील.” –ॲड. धनंजय जोगदंड, आप, अध्यक्ष कल्याण-डोंबिवली.