कल्याण- कल्याण डोंबिवली पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत ४४ प्रभागांमधील १३३ जागांवर आम आदमी पक्षाने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीची जय्यत तयारी ‘आप’ने सुरू केली आहे. येत्या पालिका निवडणुकीत मतदारांनी ‘आप’वर विश्वास दाखवून पालिकेत सत्ता आणून दाखविली तर कल्याण, डोंबिवलीतील रहिवाशांना दिल्लीच्या धर्तीवर मोफत पाणी पुरवठा केला जाईल, असे आम आदमी पक्षाचे कल्याण डोंबिवली विभागाचे अध्यक्ष ॲड. धनंजय जोगदंड यांनी सांगितले. ‘आप’ची पालिका निवडणूक विषयक रणनीती जाहीर करण्यासाठी ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी कल्याणमध्ये काटेमानिवली येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी उपाध्यक्ष राजेश शेलार, कल्याण पूर्व अध्यक्ष साधना पार्टे उपस्थित होते.
कल्याण डोंबिवली पालिकेत २४ वर्षापासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. या सत्तेने शहर विकासासाठी कोणतीही भरीव कामगिरी केली नाही. आर्थिक राजधानी जवळची ही जुळी शहरे सध्या युतीच्या सत्तेने उकीरडा केला आहे. वर्षानुवर्ष रस्ते, खड्डे, कचरा, पाणी टंचाई, दुर्गंधी, गटारे, पायवाटा याच चौकटीत येथील रहिवासी राहत आहेत. पालिकेतील शिवसेनेच्या सत्तेला लोक कंटाळली आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा निधी, त्याची कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. फेरीवाले, वाहन कोंडींनी रहिवासी हैराण आहेत. नवीन रस्त्यांचे नियोजन नाही. त्यात वाहने वाढत असल्याने शहरातील सर्व रस्त्यांवर दररोज वाहन कोंडी होत आहे. बेसुमार बेकायदा बांधकामे सुरू आहेत. शहराचे नियोजन बिघडविले जात आहे. राखीव भूखंड हडप केले जात आहेत. त्यामुळे लोकांना शहरासाठी नावीन्यपूर्ण काय हवे आहे. लोकांची पालिका, शहरांविषयी मते काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपचे कार्यकर्ते डोंबिवली, कल्याणमध्ये घऱोघरी जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत, असे अध्यक्ष जोगदंड यांनी सांगितले.
पालिकेच्या ४४ प्रभागांमध्ये उमेदवारीसाठी नवतरूण, शिक्षित, महिला, पुरूष उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. पालिकेत पारदर्शी कारभार हे घोष वाक्य ठेऊन निवडणूक लढविण्यात येणार आहे, असे जोगदंड यांनी सांगितले. यावेळी ‘आप’चे कार्याध्यक्ष सुधाकर कदम, व्यंकटेश पेरूमल, शैलेन्द्र सूर्यवंशी, रवी जाधव, रुपाली शेकदार, करूणा सातदिवे उपस्थित होते.