विविध जाती, प्रजातींच्या पाळीव कुत्र्यांचे (पेट) संगोपन, त्यांचा निवारा आणि त्याचबरोबर त्यांना अत्यावश्यक प्रशिक्षण देण्याचे काम मागील पंचवीस वर्षे डोंबिवलीतील ‘पेट’ प्रशिक्षक आरती म्हसकर करीत आहेत. घरात पंचवीस वर्षे पाळीव कुत्र्यांचा (पेट) वावर असल्याने म्हसकर कुटुंबीयांमधील प्रत्येक सदस्य आता पाळीव प्राण्यांच्या प्रशिक्षणात सराईत बनला आहे.
म्हसकर यांच्या ‘पेट’ निवारा केंद्रात सुट्टीच्या काळात मुंबई, ठाणे, बदलापूर, कोल्हापूरसह राज्याच्या विविध भागांतील पाळीव प्राण्यांचे मालक आपल्या कुटुंब सदस्याला आणून ठेवतात. या ठिकाणी प्राण्यांची योग्य देखभाल आणि त्यांना प्रशिक्षण मिळेल याची खात्री असते. सुट्टीच्या दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीत हे परक्या घरचे प्राणी म्हसकर यांच्या निवारा केंद्रात यथेच्छ आराम करतात, खेळतात, बागडतात. सुट्टीच्या काळासाठी आपण दुसऱ्याच्या घरात आलोय याची जाणीव या प्राण्यांना होऊ नये अशा पद्धतीने वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे ‘पेट’ निवारा केंद्राच्या आरती म्हसकर यांनी सांगितले.
डोंबिवलीतील रामनगरमध्ये बोडस सभागृहाजवळ म्हसकर यांचे पेट निवारा केंद्र आहे. बाराही महिने या निवारा केंद्रात विविध जाती, प्रजातींचे पेट प्रशिक्षण घेण्यासाठी ठेवण्यात येतात. मागील पंचवीस वर्षांत हजारो प्राण्यांना संगोपन आणि प्रशिक्षण देण्याचे काम आरती यांनी केले आहे. खासगी नोकरी सोडल्यानंतर घरात बसून करायचे काय, म्हणून त्यांनी घरबसल्या हे निवारा केंद्र सुरू केले. पाळीव कुत्रे प्रशिक्षणाचे कोठेही प्रशिक्षण न घेता घरबसल्या पाळीव कुत्रे, त्यांच्या प्रजाती, त्यांची वर्तणूक याविषयीची पुस्तके वाचली. आरती यांच्याकडून पेटना देण्यात येणारे प्रशिक्षण, हाकारे, इशारे व खाऊपिऊचे नियोजन पाहून गायकवाड या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना केवळ विरंगुळा म्हणून नव्हे तर पूर्णवेळ पेट केंद्र चालवा, असा सल्ला दिला. या सल्ल्याचे काटेकोरपणे पालन करीत पेटविषयकच्या अनुभवविश्वातून म्हसकर यांचे पेट निवारा केंद्र सुरू झाले.
सहा महिन्यांपासून ते दहा वर्षांपर्यंत पाळीव कुत्र्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी असतो. पोलिसांकडील कुत्रे दहा वर्षांपर्यंत प्रशिक्षण घेतात. घरगुती कुत्र्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण पुरेसे होते. पोलिसांच्या कुत्र्यांसमोर आव्हानात्मक कामे असतात. त्यामुळे तेवढे प्रशिक्षण त्यांना गरजेचे असते. कुत्र्याची नजर यावरून तो कुत्रा किती हिंस्र, मवाळ प्रजातीचा आहे, याची पहिली जाणीव होते. त्याप्रमाणे पेटचे प्रशिक्षण सुरू केले जाते, असे म्हसकर यांनी सांगितले. मालकाने निवारा केंद्रात आणल्यावर पाळीव प्राण्याला मालकाने किती इशारे शिकवले आहेत. पुढे त्या प्राण्याची गती किती आहे, याचा अंदाज घेऊन पुढचे संगोपन व प्रशिक्षण सुरू केले जाते. म्हसकर कुटुंबीयांच्या निवासाला प्राणी प्रशिक्षणाची सवय जडली आहे. आरती यांच्या तालमीत तयार झालेले त्यांचे पती उदय, मुलगा तन्मय हेही आता निवारा केंद्रात येणाऱ्या प्राण्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत. सूनबाईने प्राणी प्रशिक्षणाचे धडे शिकून घ्यावेत यासाठी सासूबाई आरती यांचा आग्रह आहे.

प्रशिक्षित पेट
डॉबरमॅन, पॉमेरिअन, रॉट, व्ॉमेनरा, कॉक स्पॅनिरा, डाल्मेशन, मस्टिक, टफी, जर्मन शेफर्ड, कोली, शिफ्टडॉग, अफगाण हाऊंड, रॉटव्हिलर अशा पेटच्या विविध प्रजातींना आरती यांनी प्रशिक्षण दिले आहे. उत्तम पेट प्रशिक्षक म्हणून एका कुत्र्यांच्या प्रदर्शनात आरती म्हसकर यांचा बेस्ट पेट ट्रेनर म्हणून सन्मान करण्यात आला आहे.

 

Story img Loader