भिवंडीत एका दीड वर्षाच्या बालकाचे अपहरण करून ते एक लाख पाच हजार रुपयांना विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात भिवंडी शहर पोलिसांनी मुलाची सुखरूप सुटका करून तिघांना अटक केली आहे.गणेश मेमुल्ला (३८), भारती शाहू (४१) आणि आशा शाहू (४२) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. भिवंडी येथील कामतघर भागात २६ जानेवारीला २८ वर्षीय महिला कामानिमित्ताने बाहेर गेली होती. त्या घरी आल्या असता, त्यांचा दीड वर्षीय मुलगा घरी आढळून आला नाही. त्यानंतर याप्रकरणी त्यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हेही वाचा >>>ठाणे: मुख्यमंत्री रमले शाळेच्या आठवणीत
या तक्रारीच्या आधारे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने याप्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावेळी भिवंडीमध्ये राहणाऱ्या गणेश याचा याप्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने गणेश याला कामतघर येथून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. तसेच मुलाला भारती आणि आशा या दोघा बहिणींना एक लाख पाच हजार रुपयांना विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी भारती आणि आशा या दोघींना ताब्यात घेतले. याप्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.