डोंबिवली: गल्ल्यातील पैसे का घेतोस म्हणून वडील ओरडले. त्याचा राग आल्याने १४ वर्षाचा मुलगा घर सोडून रविवारी निघून गेला. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो आढळून न आल्याने त्याचे कोणीतरी अपहरण केले असल्याचा संशय व्यक्त करुन विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. डोंबिवलीत उमेशनगरमध्ये ही घटना घडली आहे.
चेतन अजय कदम (१४) असे घरातून रागाने निघून गेले्ल्या मुलाचे नाव आहे. अजय कदम हे मासळी विक्रीचा व्यवसाय करतात. ते डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर मधील सत्यवान चौक परिसरात राहतात. मासे विक्रीतून आलेले पैसे ते घरातील गल्ल्यात ठेवतात. त्यांचा मुलगा चेतन त्यांच्या नकळत गल्ल्यातील पैसे काढून घ्यायचा. हे त्यांच्या निदर्शनास आले होते. रविवारी त्यांनी मुलगा चेतन याला गल्ल्यातील पैसे का काढून घेतोस म्हणून विचारणा करुन त्याच्यावर रागावले. थोड्याने वेळाने चेतन घराबाहेर पडला. तो परत घरी आलाच नाही. कुटुंबीयांनी त्याचा परिसरात शोध घेतला, तो आढळून आला नाही. त्याचे अपहरण झाले असल्याचा संशय व्यक्त करुन वडील अजय यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
हेही वाचा: ठाणे: नितीन कंपनी पूलाजवळ टेम्पोला अपघात; वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल
गेल्या आठवड्यात डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर मधील एका उद्योजकाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. पाच दिवसाच्या अथक प्रयत्नाने मानपाडा पोलिसांनी अपहृत मुलाची सुखरुप सुटका करून आरोपींना अटक केली होती. दोन वर्षापासून आरोपी उद्योजकाच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करत होते.