ठाणे : शिळ-मुंब्रा, कळवा, भिवंडी परिसरात १ लाख ९३ हजार कायमस्वरूपी खंडित (पीडी) वीज मीटरचे थकबाकीदार असून त्यापैकी २ हजार ७५० थकबाकीदारांनी विलासराव देशमुख अभय योजनेत थकीत रकमेचा भारणा केला आहे. तर, उर्वरीत १ लाख ९० हजार २५० थकबाकीदारांनी अद्याप थकीत रकमेचा भारणा केलेला नाही. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत लागू असणाऱ्या अभय योजनेत कर सवलत देऊनही त्याकडे थकबाकीदारांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिळ-मुंब्रा, कळवा, भिवंडी परिसरात टोरंट कंपनीने वीज वितरण आणि वीज देयक वसुलीचे काम करते. या भागात मोठ्याप्रमाणात कायमस्वरूपी खंडित (पीडी) मीटरचे थकबाकीदार असल्याचे समोर आले आहे. शिळ-मुंब्रा, कळवा परिसरात सुमारे १ लाख १० हजार ग्राहकांकडे एकूण ३५० कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे. तर, भिवंडीत सुमारे ८३ हजार कायमस्वरूपी खंडित (पीडी) मीटरचे थकबाकीदार असून त्यांच्याकडे एकूण १ हजार १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे. या थकबाकीदारांनी थकीत रकमेचा भारणा करावा यासाठी राज्य शासनाने विलासराव देशमुख अभय योजना लागू केली असून या योजनेला थकबाकीदारांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही.
मागील ऑगस्ट महिन्यापर्यंत शिळ-मुंब्रा, कळवा परिसरातील १ हजार ५० थकबाकीदारांनी अभय योजनेंतर्गत थकबाकी भरली आहे. तर भिवंडीतील ६५० थकबाकीदारांनी अभय योजनेअंतर्गत थकबाकी भरली होती. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शिळ-मुंब्रा, कळवा परिसरातील १ हजार ६५० थकबाकीदारांनी ७ कोटी तर भिवंडीत १ हजार १०० थकबाकीदारांनी २५ कोटींची थकबाकी अभय योजनेंतर्गत भरली आहे. विलासराव देशमुख अभय योजना येत्या ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहणार असून त्यासाठी अवघे २५ दिवस शिल्लक आहेत. असे असले तरी या योजनेचा फायदा घेणाऱ्या थकबाकीदारांची संख्या कमी असल्याचे दिसून येते.
हेही वाचा: कल्याण: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ लोंबकळणाऱ्या केबल वाहिनी जवळूनच प्रवाशांची ये-जा
अभय योजना
मार्च-२२ मध्ये महावितरणने कायमस्वरूपी खंडित (पीडी) मीटरची जुनी महावितरणची थकबाकी असलेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना लागू केली. ही योजना महावितरणची पीडी थकबाकी असलेल्या ग्राहकांना शंभर टक्के व्याज माफी देते. या योजनेद्वारे, ग्राहक केवळ मूळ रक्कम भरून त्यांच्या जमा झालेल्या थकबाकीतून मुक्त होऊ शकतात. या योजनेचा टोरंट पॉवर कंपनीने जनता दरबार तसेच इतर माध्यमातून प्रचार केला आहे. तरीही या योजनेस थकबाकीदारांचा कमी प्रतिसाद मिळाला आहे. ही योजनेची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे, अशी माहिती टोरंट कंपनी प्रशासनाने दिली आहे.