लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवर चालू आर्थिक वर्षासाठी अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवर १५ जानेवारी २०२५ पर्यंत १०० टक्के दंड आणि व्याज, १६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंत ७५ टक्के दंड आणि व्याज माफ होणार आहे.

कर भरणाऱ्या नागरिकांनी या दोन्ही सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. हा कर भरणा करण्यासाठी पालिकेने ऑनलाईन माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांना पालिकेने वेळोवेळी नोटिसा पाठवून कर थकबाकी भरणा करण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांच्याकडून विहित वेळेत थकित कर भरणा झाला नाहीतर मात्र संबंधितांची मालमत्ता जप्त करणे, त्यानंतर त्या मालमत्तेचा लिलाव करणे, त्या मालमत्तेसह इतर मालमत्तांवर टाच आणणे या प्रक्रिया पालिकेकडून पार पाडल्या जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

आणखी वाचा-जितेंद्र आव्हाड यांनी दिला मंत्री सरनाईकांना मित्रत्वाचा सल्ला

पालिकेला चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कराचे सुमारे ७५० कोटीचे तर पाणीपट्टीचे ९० कोटीचे लक्ष पूर्ण करायचे आहे. यासाठी पालिकेने कर विभागाच्या माध्यमातून मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली मोहिमा सुरू केल्या आहेत.

सुविधा केंद्रे सुट्टीतही

पालिकेची नागरी सुविधा केंद्रे शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील बहुतांशी नोकरदार हा मुंबई परिसरात नोकरीला जातो. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार , शनिवार या कालावधीत त्यांना कर भरणा, पाणी पट्टी भरणा करणे शक्य होत नाही. अशा नोकरदार वर्गाचा विचार करून प्रशासनाने शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Story img Loader