ठाणे : अजित पवार गटात जाण्यासाठी माझ्यावर अतिशय दबाव टाकण्यात आला होता आणि केवळ आमदार जितेंद्र आव्हाड यांना अडकविण्यासाठीच माझा वापर केला जाणार होता, असा गंभीर आरोप करत जितेंद्र आव्हाड यांचा फोन आला नसता तर, मी २२ फेब्रुवारीला आत्महत्या करणार होतो, अशी प्रतिक्रिया अभिजीत पवार यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच जितेंद्र आव्हाड हेच माझे नेते असून त्यांची साथ कधीही सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते व कळवा मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार आव्हाड यांना धक्का दिल्याची चर्चा रंगली असतानाच, गुरूवारी अभिजीत पवार यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला रामराम करत पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला. यानंतर अभिजीत यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन या पक्ष प्रवेशासाठी प्रचंड दबाब टाकण्यात आला होता, असा आरोप केला.

माझ्यावर गुन्हा दाखल करुन मला पुन्हा दोन वर्षे जेलमध्ये पाठविण्याचा कट रचण्यात आला होता. माझ्या मित्रांवर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांना पोलिसांमार्फत धमक्या दिल्या जात होत्या. मला ईडीची धमकी दिली जात होती. नजीब मुल्ला हे इतरांकरवी मला फोन लावून धमक्या देण्याचे काम करीत होते. या सर्व प्रकारामुळे मी अस्वस्थ झालो होतो आणि यातूनच हा प्रकार घडला, असे अभिजीत पवार म्हणाले. अजीत पवार यांच्या पक्षात जाण्यापुर्वी जितेंद्र आव्हाड यांच्याशी बोलायला हवे होते. परंतु माझ्यावर असलेल्या प्रचंड दबावामुळे मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही. तिथे मी मनाने गेलो नव्हतो परंतु मी घेतलेल्या आजच्या निर्णयानंतर ठाण्यातील ब्लेकमेलिंगचे प्रकार थांबतील, असे अभिजीत म्हणाले.

माझा वापर केवळ जितेंद्र आव्हाड यांना अडकविण्यासाठी केला जाणार होता, हे लक्षात येताच मी पुन्हा आव्हाड यांच्याकडे आलो. माझ्या आईला आणि पत्नीला देखील घाबरविण्याचा प्रयत्न झाला होता. मित्रांनाही घाबरविले जात होते. एकूणच गेल्या काही दिवसांत झालेल्या प्रकारांमुळे मी व्यथित झालो होतो. पक्ष प्रवेशाच्या दिवशी मी माझे फोन बंद ठेवले होते आणि २२ फेब्रुवारीला आत्महत्या करणार होतो. पण, दुसऱ्यादिवशी फोन चालू केला आणि तेव्हा जितेंद्र आव्हाड यांचा फोन आला. त्यावेळी त्यांनी माझी विचारपूस केली. त्यांचा फोन आला नसता तर, मी २२ फेब्रुवारीला आत्महत्या केली असती, असे अभिजीत यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनी मला स्विकारू दे किंवा नको स्विकारू दे. पण, तेच माझे नेते आहेत आणि मी त्यांची साथ मरेपर्यंत कधीही सोडणार नाही, असे ते म्हणाले.

Story img Loader