लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर शासनाने कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती केली. यापूर्वी ते हिंगोली येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. उमद्या वयोगटातील थेट भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवली पालिकेला दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अभिनव गोयल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील सन २०१५ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. ते उत्तरप्रदेशातील मेरठ येथील मूळ रहिवासी आहेत. गोयल यांनी तिसऱ्या प्रयत्नात आय. ए. एस. परीक्षा उत्तीर्ण केली आहे. देशात ३६ वा क्रमांक पटकावला आहे. कानपूर येथील आयआयटीमधून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या घरातील शिक्षणाचा वारसा उल्लेखनीय आहे. अभिनव गोयल यांचे आई, वडिल डॉक्टर आहेत. आजोबा भौतिकशास्त्र आणि आजी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या. उच्च शैक्षणिक वारसा असलेल्या घरातून गोयल यांची वाटचाल आणि तो संस्कार त्यांच्यावर आहे.

गोयल यांनी नांदेड येथे साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरूवात केली. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. अलीकडे ते हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते.

प्रशासकीय कामाच्या ठिकाणी त्यांनी कठोर शिस्त, सचोटीने काम केल्याची चर्चा आहे. या प्रशासकीय कामाच्या अनुभवाच्या बळावर ते कल्याण डोंबिवली पालिकेला विकासाच्या वाटेवर नेतील, असा विश्वास नागरिकांना आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत नागरी विकासाची अनेक कामे रखडली आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पाची महत्वपूर्ण कामे अंतिम टप्प्यात आहेत. मागील चार ते पाच वर्षात भविष्यवेधी एकही नवीन प्रकल्प पालिका हद्दीत आकाराला आला नाही. त्यामुळे विकासाच्या वाटेवरील या शहरात नागरी विकासाचे भविष्यवेधी प्रकल्प होणे गरजेचे आहे. परंतु, ई. रवींद्रन, पी. वेलरासु हे दोन थेट ज्येष्ठ सनदी अधिकारी येऊन गेल्यानंतर शासनाने कल्याण डोंबिवली पालिकेत राजकीय आशीर्वादाचे पदनिर्देशित अधिकारी आयुक्त म्हणून नेमले.

या आयुक्तांचे लगाम राजकीय मंडळींच्या हातात असल्याने त्यांनी स्वतंत्र बाण्याने पालिकेत कधी कामच केले नाही. त्यामुळे शहर हिताची अनेक महत्वाची कामे रखडली. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पहिल्या सहा महिन्यात भविष्यवेधी प्रकल्प हाती घेण्याचे सुतोवाच केले होते. परंतु, त्यांनाही नंतर राजकीय अडथळ्यांची मोठी शर्यत पार पाडावी लागली. काम करताना जागोजागी राजकीय अडथळे येऊ लागल्याने त्यांनी नंतर लोकांशी निगडित किरकोळ प्रकल्प मार्गी लावण्यावर भर दिला. राजकीय वाढत्या हस्तक्षेपाला त्रस्त होऊन डॉ. जाखड यांनी पालिकेत निघून जाणे पसंत केल्याची चर्चा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर गोयल किती निर्भिडपणे काम करतात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना किती मोकळेपणा काम करण्याची मुभा दिली आहे. की त्यांनाही राजकीय अडथळे येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.