कल्याण : कल्याण मधील मध्यवर्गिय शिक्षक कुटुंबातील अभिषेक भास्कर साळेकर याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. कष्ट, मेहनत आणि जिद्दीने आपण हे यश संपादन केले आहे, असे तंत्रकुशल (बी.ई-मेकॅनिकल) क्षेत्रातील अभिषेक सांगतो.
अभिषेकचे आजोबा मुकुंद दामले मेकॅनिकल इंजिनीअर होते. ते बी. ए. आर. सी. मध्ये उच्चपदस्थ होते. आजोबांबरोबरच्या चर्चा, प्रशासकीय अनुभवातून अभिषकेने आजोबांसारखे तांत्रिक क्षेत्रातील शिक्षण पूर्ण करून लोकसेवेत उतरायचे असा निर्णय केला होता. शालेय, महा – विद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच अभिषकेने आपणास स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नोकरी मिळवून पुढे जायाचे आहे हे ठरविले होते. अभिषेकचे वडील भास्कर मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षक, आई कल्याण मधील एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. बालपणापासून अभिषेकला घरातून अभ्यास, अवांतर चौफेर वाचन, मार्गदर्शन होत होते.
हेही वाचा : विश्लेषण : टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान धोकादायक संघ… पण जगज्जेतेपदाची संधी किती?
कल्याण मध्ये शिक्षण
कल्याण पश्चिमेतील सुभेदारावाडा शाळेत अभिषकने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बारावीपर्यंतचे शिक्षण बी. के. बिर्ला महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पूर्ण केले. बारावीनंतर अभिषेकने नाशिक येथील के. के. वाघ इंजिनीअरिंग महाविद्यालयात बी.ई.(मेकॅनिकल) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आयआयटी, मुंबई, एमआयटी, गांधीनगर येथील प्रवेशासाठी प्रयत्न केले. तांत्रिक शिक्षणातील स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाठी अभिषेक एक वर्ष हैदराबाद येथे गेला. हा अभ्यास सुरू असताना मार्च २०२० मध्ये अभिषकेने महाराष्ट्रात लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठीची पूर्व परीक्षा दिली. या परीक्षेनंतर करोना महासाथ सुरू होऊन टाळेबंदी लागू झाली. पूर्व परीक्षेचा निकाल मग मुख्य परीक्षा कधी होणार याची कोणतीही शाश्वती नाही. असे धूसर चित्र समोर असताना अभिषेकने अंबरनाथ येथील खासगी कंपनीत अभिकल्प अभियंता (डिझाईन इंजिनीअर) म्हणून एक वर्ष नोकरी केली.
करोना महासाथ कमी झाली. पूर्व परीक्षेतील यशानंतर मुख्य परीक्षा होण्याचे संकेत मिळू लागले. मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी खासगी नोकरी सोडून आठ महिने अभिषकेने घरात अभ्यास केला. हैदराबाद येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तयारी झाली होती. त्याची उजळणी त्याने पुन्हा केली. नोव्हेंबर २०२१ मध्ये अभिषकेने लोकसेवा आयोगाची साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची मुख्य परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.या परीक्षेत अभिषकेने राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. २६२.५ गुण त्याला मिळाले आहेत. हे आयोगाच्या तांत्रिक परीक्षेच्या इतिहासातील सर्वोच्च गुणांकन आहे. पहिल्याच प्रयत्नात एवढे घवघवीत यश मिळाल्याबद्दल अभिषेक समाधानी आहे. आता लवकरच नेमणुकीच्या प्रक्रिया पूर्ण होऊन आपणास एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी जावे लागेल. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागात प्रत्यक्ष कर्तव्याला सुुरुवात होईल, असे अभिषेकने सांगितले.
इतिहासाची आवड
अभिषेकला बालपणापासून चित्रकला आणि इतिहास विषयाची आवड आहे. इतिहासकालीन बहुतांशी पुस्तके, जेधे शकावलींसारखी पुस्तके, ऐतिहासिक दस्तऐवजांचे वाचन हा अभिषेकचा छंद आहे. शिव, इतिहास काळातील पुस्तकांचे वाचन करुन त्यावर आधारित चित्र काढणे अभिषेकला आवडते. अशी अनेक चित्रे त्याने काढली आहेत. येत्या काळात चित्रमय शिवचरित्र करण्याचा त्याचा मानस आहे.
” या परीक्षेचा अभ्यास समर्पित भावाने केला होता. पास होऊ असे वाटले होते. एवढे घवघवीत यश मिळून राज्यात प्रथम येऊन असे वाटले नव्हते. प्रथम प्रयत्नात हे यश मिळविले आहे. पुढील यशाचे टप्पे लवकर पार करण्याचा प्रयत्न करू. मनातील लोकसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे याचे खूप समाधान आहे.” -अभिषेक साळेकर,साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक,कल्याण