कधी रुसवा, कधी भांडण, तर कधी माया, प्रेम या भावनांचे अनोखे मिश्रण असलेले भावाबहिणीचे नाते खऱ्या अर्थाने दोघांनाही प्रेमाने अनुभवायला मिळते ते रक्षाबंधन या दिवशी. नेहमी एकमेकांशी छोटय़ा छोटय़ा कारणांनी वाद घालणारी ही भावंडे हा दिवस मात्र वेगळय़ाच उत्साहात साजरा करतात. रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेण्यासाठी भाऊराया भलताच उत्सुक असतो. अगदी लहान मुलांपासून ते मोठय़ा व्यक्तींपर्यंत सगळेच जण श्रावण महिन्यात येणाऱ्या या दिवसाची वाट पाहत असतात, कारण आपल्या लाडक्या बहिणीकडूून प्रेमाचा एक धागा त्यांच्या हातावर बांधला जाणार असतो. श्रीकृष्णाच्या हाताला जखम झालेली असताना द्रौपदीने त्याच्या हाताला आपल्या साडीचा तुकडा बांधला आणि श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले, तर चित्तोडगढची राणी कर्मावतीने बहादूरशहापासून रक्षण करण्यासाठी मुघल राजा हुमायूला राखी बांधली, अशा काही पौराणिक/ऐतिहासिक कथा सांगितल्या जातात. तेव्हापासून उत्तर भारतात कजरी पौर्णिमा आणि पश्चिम महाराष्ट्रात राखी पौर्णिमा म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
काळ बदलत गेला तसा आधुनिक जीवनशैलीने सणांमध्येही शिरकाव केला. रक्षाबंधनाच्या दिवशी राखीचे महत्त्व वाढले आणि दैनंदिन आयुष्यात आवर्जून केली जाणारी फॅशन राखीमध्येही दिसू लागली. पूर्वी केवळ एक धागा बांधला जायचा. त्यात आता काळानुसार बदल होऊन राख्यांचे वेगवेगळे प्रकार बाजारात यायला लागले आहेत. आजच्या काळात रक्षाबंधनाच्या दोन आठवडे आधीपासूनच मुली, महिलांची आपल्या भाऊरायाला राख्या खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी पाहायला मिळते. ठाण्याच्या बाजारातही अनेक दुकानांमध्ये किंवा मोठय़ा दुकानांच्या बाहेर रंगीबेरंगी राख्यांची विक्री होत आहे.
पिझ्झा हट आणि डोमिनोज
लहान दोस्तांना हमखास आवडतील अशा पिझ्झा हट आणि डोमिनोजचे चित्र राख्यांवर पाहायला मिळत आहेत. छोटा भीम, टॉम आणि जेरी यांसारख्या कार्टून्सच्या जोडीला लहान मुलांसाठी ही पिझ्झा हट आणि डोमिनोजची राखी बाजारात आकर्षण ठरत आहे.
रुद्राक्ष राखी
तरुणांच्या दृष्टीने या रुद्राक्ष राखीला फा रशी मागणी नसली तरी वयस्कर महिला आपल्या भावासाठी आवडीने या राख्या खरेदी करीत आहेत. रुद्राक्ष फळ खरे तर डोळे, डोकेदुखी यावर गुणकारी आहे, पण दैनंदिन आयुष्यात ते वापरणे शक्य होत नाही. त्यामुळे निदान रक्षाबंधनाच्या निमित्ताने हे रुद्राक्ष हातावर बांधले जाईल म्हणून की काय या रुद्राक्ष राख्या तयार केल्या जातात. अगदी पातळ असलेल्या वेगवेगळ्या रंगांच्या धाग्यात हे नाजूक रुद्राक्ष फळ त्याच्या बाजूच्या मोत्यांनी किंवा रंगीबेरंगी मण्यांनी गुंफलेले आहे. त्यामुळेच नाजूक, पण पाहताच क्षणी या राखीची नक्षी आपल्याला भावते.
गोल्ड आणि सिल्व्हर प्लेटेड राखी
गणपतीची मूर्ती असणाऱ्या किंवा स्वस्तिक असलेल्या, सोने आणि चांदीचा मुलामा असलेल्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. सोने, चांदी आणि त्यावर एखादा हिरा असलेली राखी नाजूक, पण उठावदार दिसते.
कुठे
गावदेवी, गोखले रोड,
नौपाडा येथील दुकानांमध्ये
किंमत: १० ते ३०० रुपयांपर्यंत
चॉकेलट राखी..
लहान दोस्तांसाठी चॉकलेट अत्यंत प्रिय. हे चॉकलेट राख्यांवर असले तर छोटय़ा दोस्तांची मजाच मजा. राखी आणि त्यावर रंगीबेरंगी कागदात बंद केलेले हे चॉकलेट बहिणीने भावाला दिले, तर ओवाळणीसाठी वेगळ्या गोडाची आवश्यकताच वाटणार नाही. चॉकलेट खायचे असल्यास राखीवरचे ते कागद उघडून खाल्ले तरी राखी हातावर तशीच बांधलेली राहते.