इक्विपकिड, ठाणे
सुमारे ३२ देशांमधून आलेले साडेतीनशे डॉक्टर व संशोधक अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात त्या भारतीय बालरोगतज्ज्ञाचे भाषण एकाग्रतेने ऐकत होते. एक वेगळाच विचार हा डॉक्टर मांडत होता. विषय होता ‘भावनिक लसीकरण’.. लसीकरण हा विषय आता साऱ्यांनाच परिचित. परंतु ‘भावनिक लसीकरण’ ही संकल्पनाच वेगळी होती. हार्वर्डसारख्या विख्यात संस्थेत दहा मिनिटे भाषणाची संधी मिळणेही जिथे भाग्याची गोष्ट. तिथे हा डॉक्टर जवळपास दीड तास आपले संशोधनपर निबंध सादर करत होता. त्यांचे सादरीकरण संपले आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.. या डॉक्टरांचे नाव आहे, डॉ. संदीप केळकर.
गेली सुमारे तीन दशके बालरोगतज्ज्ञ म्हणून डॉ. केळकर हे ठाणेकरांना परिचयाचे आहेतच, परंतु केवळ लहान मुलांचा आजार बरा केला म्हणजे सर्व काही संपले असे न मानता या मुलांमधील भावनिक प्रज्ञा कशी वाढेल यावर त्यांचे अंखड संशोधन सुरू असते. त्याचाच परिपाक म्हणजे अमेरिकेतील हार्वर्डमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘भावनिक बुद्धिमत्ता’ या विषयावरील सातव्या आंतराराष्ट्रीय परिषदेतील डॉ. केळकर यांचे भाषण होय. या परिषदेत जगभरातून आलेल्या डॉक्टर व संशोधकांनी भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेतील नवीन संशोधन व त्यांच्या प्रयोगांचे सादरीकरण केले. तथापि डॉ. केळकर यांनी मांडलेल्या विचाराला एक वेगळीच दाद तज्ज्ञांकडून मिळाली.
भावनांक म्हणजे इमोशनल कोशंक (ईक्यू) या विषयावर जगभर गेल्या तीन दशकांपासून संशोधन सुरू आहे. डॉ. संदीप केळकर या विषयाकडे वळले त्यालाही एक वेगळेच कारण घडले. डॉक्टर पती-पत्नी असलेल्या त्यांच्या एका मित्राच्या दहावीतील हुशार मुलाने चारवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. कारण काही समजत नव्हते. यासाठी डॉ. केळकर यांनी जगभरात यावर काही संशोधन- उपचार आहेत का याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यातूनच मानवी मेंदू व भावनांचा संबंध यावर अभ्यास करताना ते या विषयाकडे वळले. अमेरिकेत शाळेतील लहान मुलांनी बेछूट गोळीबार केल्याच्या व त्यात काही मृत्यू झाल्याच्या बातम्या तेथील वर्तमानपत्रात अनेकदा प्रसिद्ध होताना दिसतात. भारतातही गेल्या काही दशकांत लहान मुले आत्महत्या करताना, चोरीपासून अनेक चुकीचे उद्योग करताना तसेच नैराश्य, भीतीने ग्रासलेले दिसतात. परीक्षेच्या भीतीसह लहान मुलांमध्ये भांडणाचे त्यातही रक्तबंबाळ होईपर्यंत दुसऱ्याला मारण्याच्या घटनांमध्येही वाढ झालेली दिसते. एकतर्फी प्रेमातून प्रेयसीवर क्रूर हल्ले करण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. हे सारे मुलांच्या भावनिक गुंत्याशी संबंधित विषय आहेत. त्यातूनच भारतीय जीवनपद्धतीचा विचार करून ‘भावनांविषयक’ अभ्यास व संशोधन करणारी संस्था काढण्याचा निर्णय डॉ. संदीप केळकर यांनी घेतला. त्यासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील ‘सिक्स सेकंदस्’ या भावनांचा विशेष अभ्यास करणाऱ्या संस्थेत जाऊन रीतसर प्रशिक्षण घेतले. असा अभ्यास करणारे ते भारतातील पहिले डॉक्टर आहेत.
भावनांचा मुलांमधील उद्रेक व भावना अनावर होणे ही समस्या हाताळणे पालकांनाही बदलत्या जीवनशैलीमुळे कठीण होऊन बसले आहे. आजघडीला मुलांमधील आत्महत्येचे प्रमाण १२५ टक्क्य़ांनी वाढले आहे तर आत्महत्येचा विचार करणारी ५५ टक्के आहेत. नैराश्य येण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे तसेच मानसिक आजारातही प्रचंड वाढ झाल्याचे डॉ. संदीप केळकर सांगतात. प्रामुख्याने शहरी भागात जेथे आई-वडील दोघेही नोकरी करतात अशा ठिकाणी मुलांना संस्कार देणे तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवणे जवळपास अशक्य होऊन बसले आहे. त्यामुळे केवळ मुले या घटकाचा विचार न करता पालक तसेच बालरोग डॉक्टर व समाजसेवकांही योग्य प्रशिक्षण मिळण्याची गरज असल्याचे मत डॉ. केळकर व्यक्त करतात. यासाठी त्यांनी २३ एप्रिल २००६ रोजी ठाण्यातील कौशल्या हॉस्पिटल येथे ‘इक्विपकिड’ नावाची संस्था स्थापन केली. २३ एप्रिल २०१६ ला संस्थेला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या विषयातील सखोल संशोधन व कामासाठी डॉ. केळकर यांनी आता स्वतंत्र जागाही घेतली असून येत्या एक जून ते पाच जून या काळात ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय पद्धतीने मुलांमधील भावनांक वाढवता येतो. त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवून त्यांच्यातील गुणवत्ता व कौशल्याचा विकास करता येतो हे सप्रमाण सिद्ध केले.यात पालक-मुलांसाठी कार्यशाळा, विविध वयोगटातील मुलांसाठी भावनांक (ईक्यू) वाढवणे, इक्यू कौशल्य शिकविण्यासाठी बालकांची शिबिरे आयोजित करणे, प्रशिक्षक तयार करणे आदी अनेक बाबींचा समावेश आहे. यातूनच मुलांच्या वर्तन समस्या, भावनिक समस्यांवरील उपाय व पालकांना मार्गदर्शन सुरू करण्यात आले. मुंबई, ठाणे, पुणे, इंदौर, दिल्ली, बंगलोर तसेच जमशेदपूर येथे जाऊन डॉक्टर केळकर यांनी सुमारे ५०० डॉक्टरांनाही भावनिक प्रज्ञा या विषयात प्रशिक्षित केले असून या शिक्षणामुळे देशभरातील मुलांना त्याचा लाभ होत आहे. ठाण्यातील ‘आनंद विश्व गुरुकुल’ येथे प्राध्यापक ढवळसरांच्या सहकार्यातून संस्थेचे आणखी एक केंद्र सुरू झाले. येथे भारतीय जीवनपद्धतीचा विचार करून संशोधनाचे कामही सुरू आहे, तर पुण्यातील ‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’ या अग्रगण्य शिक्षणसंस्थेत डॉ. अमृता ओक यांच्याबरोबर संशोधन प्रकल्प राबवला. यामध्ये सुमारे एक हजार मुले सहभागी झाली होती. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी केंद्र शासनाच्या ‘आयसीएसएसआर’ने भरीव मदतही दिली. या साऱ्या वाटचालीत डॉक्टर केळकर यांचे ‘जावे भावनांच्या गावा’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले असून त्याच्या चार आवृत्त्या संपून पाचवी आवृत्तीही प्रकाशित झाली, एवढा उदंड प्रतिसाद पालकांकडून मिळाला आहे.
आजार उद्भवू नये यासाठी लसीकरण केले जाते. डॉ. संदीप यांनी नेमका हाच धागा पकडून ‘भावनिक लसीकरणा’वर संशोधन केले आहे. मुलांमधील मानसिक समस्या वेगाने वाढत आहेत. ही समस्या उद्भवू नये, यासाठी हे भावनिक लसीकरण अत्यंत उपयुक्त आहे.
पत्ता- श्री प्रथमेश हॉस्पिटल, तळमजला, लक्ष्मी मार्केट, रत्नाकर बँकेच्या मागे, वर्तकनगर, ठाणे. पश्चिम.
फोन- हरीश शिंपी ९८२१३१४९४०
संदीप आचार्य
सेवाव्रत : भावनिक बुद्धिमत्तेचा अलौकिक वारसा
भावनांक म्हणजे इमोशनल कोशंक (ईक्यू) या विषयावर जगभर गेल्या तीन दशकांपासून संशोधन सुरू आहे.
Written by संदीप आचार्य
आणखी वाचा
First published on: 27-04-2016 at 05:17 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About dr sandeep kelkar