अंबरनाथ पूर्वी औद्योगिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होते, पण आता गावदेवी विभागातील शाळेला भेट दिल्यावर चित्र बदललेले आहे हे प्रकर्षांने जाणवते. ३-४ मोठय़ा कंपन्या बंद पडल्या आणि तेथील कामगारांचे जगणेच पार बदलून गेले. या शाळेत कोहज, खुंटवली, मोरीवली या भागांतील कष्टकरी वर्गातील मुले येतात. घरी आणि आजूबाजूला पोषक वातावरणाचा अभाव असल्याने शिक्षकांना प्रयत्नपूर्वक मुलांना शिक्षणाकडे वळवावे लागते. मुलांची अशुद्ध भाषा, उच्चार, त्यांच्या सवयी आदी प्रत्येक गोष्टीसाठी शिक्षकांना मेहनत करावी लागते. मुलांचे व्यवसाय भरून घेणे, टिपणवह्य़ा तयार करणे ही अतिरिक्त कामेदेखील शिक्षक मनापासून करतात. या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून संस्था आणि शिक्षक आपापल्या परीने मदत करतात. काही गरजू विद्यार्थ्यांनी फीमध्ये सवलत (वेळप्रसंगी फी माफही), परीक्षा शुल्क माफ करणे, हस्तकलेचे कागद पुरवणे आदी मदत दिली जाते.
सरकारतर्फे कृतीयुक्त शिक्षण उपक्रमाअंतर्गत संभाषण, वाचन, लेखन, गणिती क्रिया, पाढेपाठांतर आदी विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करण्यास प्राधान्य दिले जाते. अनेक शाळांमधून असे उपक्रम खऱ्या अर्थाने राबवण्याबाबत निरुत्साह दिसून येतो, पण येथील शिक्षकांची उपक्रमांची वही, मुलांनी केलेल्या हस्तकलेचे विविध नमुने, त्यांच्या कला (कविता, बालगीते इ.) पाहिल्यावर आपण थक्क होतो. शिकवण्याचे नि शिकण्याची प्रक्रिया किती आनंददायी होते ते या संपूर्ण शाळेतील प्रत्येक वर्गात अनुभवता येते. प्राथमिक विभागातून बाहेर पडताना येथील शिक्षक आणि मुलांकडून प्रचंड ऊर्जा, उत्साह घेऊन बाहेर पडताना लक्षात राहतात ती डोळ्यात भविष्याची स्वप्ने साठवलेली, नवीन शिकण्याची, टिपून ठेवण्याची धडपड करणारी निरागस, आनंदी मुले!
अशा तऱ्हेने प्रयत्नपूर्वक मुलांना घडवण्याच्या दृष्टीने माध्यमिक विभागही पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक विभागाप्रमाणे प्रयत्नशील असतो. शाळेत वर्षभर विविध सणवार उत्सव आणि स्पर्धाचे आयोजन केले जाते. यामध्ये दीपोत्सव, १ जाने. रोजी नववर्ष स्वागतासाठी निघणारी प्रभातफेरी, श्रावणमासातील मातृदिन यांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. दीपोत्सवाच्या दिवशी दिव्यांनी भारताचा नकाशा तयार केला जातो. नववर्षांचे स्वागत करताना प्रभातफेरी काढली जाते, मातृदिनाच्या दिवशी बालके आईचे औक्षण करून खरोखर पूजन करतात.
जुन्या-नव्याचा समन्वय साधत विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत आणि शैक्षणिक पातळीवर विकास होण्याच्या दृष्टीने संस्थेच्या शाळा विशेषत्वाने प्रयत्नशील असल्याचे सातत्याने अनुभवता येते. साई विभागातील प्राथमिक विभागातदेखील वर्षभर वैशिष्टय़पूर्ण उपक्रम राबवले जातात. वन्यप्राणी सप्ताह, कागद काटकसरीने वापरण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त करणे, पौष्टिक आहार महिना, बालवीर पथक, मुलींच्या सक्षमीकरणासाठी मुलींनी मुलींना राखी बांधणे, शिवजयंतीच्या निमित्ताने पोवाडय़ातून शिवगाथा आणि दांडपट्टा, तलवार/ढाल यांचे प्रात्यक्षिक, गुरुपौर्णिमेस विद्यार्थ्यांनी स्वत: लावलेले रोप (कोरफड, तुळस असे औषधी) शिक्षकांना देणे, इ. १ली ते ७वीसाठी पुस्तकपेटी, महिला दिनानिमित्त महिला पालकांच्या स्पर्धा इ. उपक्रमांचा आवर्जून उल्लेख करायला हवा.
या शाळेतील विविध विषयांवरील प्रकल्प खरोखरच बघण्यासारखे आहेत. मराठी-अलगूज, हिंदी-फुलवारी, गणित-गणित सोबती, इंग्रजीमधील मुलांची हस्तलिखिते, पर्यावरण दिन विशेष दर्शिका इ. अनेकविध प्रकल्प पाहताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मेहनत दिसून येते. सकस आहार उपक्रमाअंतर्गत ५वी ते ७वीच्या वर्गानी भाजी-भाकरी, उसळी, सॅलड, पराठे, आंबवलेले पदार्थ, फळे असा एक-एक पदार्थ आणला आणि विद्यार्थ्यांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला.
प्रदूषणयुक्त गणेशोत्सव पथनाटय़ स्पर्धेत शाळेने दोन वर्षे प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. स्त्री भ्रूणहत्या या ज्वलंत समस्येवरील ‘आई, मी येऊ’ या पथनाटय़ाचे एमआयडीसी अंबरनाथ येथे ३ वर्षे कामगार वर्गासाठी सादरीकरण केले होते. ‘कथा संयुक्त महाराष्ट्राची’, ‘घे भरारी’, ‘सोडी व्यसनांचा पिंजरा’ ही पथनाटय़े दरवर्षी ५ गणेशोत्सव मंडळांमध्ये सादर केली गेली. सामाजिक उपक्रमाअंतर्गत ग्रामस्वच्छता अभियान, भावस्वच्छतामध्ये विद्यार्थी सहभागी होतात. अंबरनाथ येथील शिवमंदिराच्या जत्रेनंतर, गणपती विसर्जनानंतर, श्रावणी सोमवारनंतर श्रमदानाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबविली जाते. यासाठी ८वी ते १०वीचे विद्यार्थी सहभागी होतात. विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानाअंतर्गत ‘घंटागाडीचा वापर करा, कचरा कचराकुंडीतच टाका’ अशा घोषणांचे फलक तयार केले. शाळेच्या परिसरातील कचराकुंडीजवळ विद्यार्थी हे फलक घेऊन उभे राहिले व जनजागृतीचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी स्वत: कागदी पिशव्या तयार करून फळविक्रेत्यांना त्याचे वाटप केले.
शाळेतील इ. १०वीच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन दिले जाते. ताणतणावांचे नियोजन, तणावमुक्त परीक्षा इ. विषयांचा यात समावेश असतो. ‘वेध भविष्याचा’ या कार्यक्रमाअंतर्गत शाळेच्या माजी यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखतीद्वारा विद्यार्थ्यांना एक दिशा मिळते. इ. ९वीतून १०वीत गेल्यावर उल्लेखनीय प्रगतीसाठी ‘जिद्द’ बक्षीस देऊन प्रोत्साहित केले जाते. वयात येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनींना ‘उमलत्या कळ्यांनो’अंतर्गत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन दिले जाते.
भगिनी मंडळ संचालित गावदेवी आणि साई विभागातील शाळांना भेट दिल्यावर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक व शालेय स्तरावरील प्रगतीस प्राधान्य देत वैविध्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न दिसून येतात. समाजातील कष्टकरी आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी होणारे प्रयत्न मनाला समाधान देतात.
हेमा आघारकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा