समाजातील काही व्यक्ती समाजाची गरज लक्षात घेऊन आपले कार्यक्षेत्र निश्चित करतात. सामाजिक कार्याशी जोडल्या गेलेल्या सुहासिनी दिघेबाईंना ठाण्यातील आंबेडकर रोड, वडार वस्ती या भागात शाळेची निकड प्रकर्षांने जाणवली. (ही गोष्ट १९५५-५६च्या सुमारास) त्या भागातील मागासवर्गीय कष्टकरी समाजातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर होता. ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून दिघेबाईंनी शिशू ज्ञानमंदिर शाळेची स्थापना केली. १९ साली एका साध्या कुडाच्या झोपडीत ४ मुलांना घेऊन शाळेचा प्राथमिक विभाग सुरू झाला. आणि या परिसरातील मुलांना शिक्षण मिळू लागले. सुहासिनी दिघेबाईंनी पुढे ६९ साली वडारवस्तीतही त्या परिसरातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून शाळा सुरू केली. डॉ. आंबेडकर रोड, राबोडी परिसरातील मुलांच्या, पालकांच्या जिवनात शिशू ज्ञानमंदिर प्राथमिक/माध्यमिक शाळा ही एक आशेचा किरण ठरली. अल्पावधीतच शाळेची विद्यार्थी संख्याही वाढत गेली.
या परिसरातील बहुसंख्य लोक कष्टकरी, आर्थिकदृष्टय़ा दुर्बल स्तरातील, विविध कारणांमुळे फारसे शिक्षण घेतलेले नाहीत. त्यामुळे घरी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास, शैक्षणिक विकास यासाठी आवश्यक अशा पोषक वातावरणाचा अभाव दिसून येतो. पालकांपुढेच जगण्याचे अनेक प्रश्न, समस्या असल्याने जीवन संघर्षमय आहे. पर्यायाने मुलेदेखील जगण्याचे दाहकरूप अनुभवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना घडवण्याची आवड निर्माण करण्याची, त्यासाठी अनेकविध उपक्रम राबवण्याची संपूर्ण जबाबदारी शाळेतील शिक्षकांवरच असते. खरतर शिक्षकांसाठी फार मोठे आव्हान असते असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. पालक शिक्षीत नसल्याने मुलांतूनच मुलांना तयार करून, त्यांना शाळांत परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने शिक्षकांना अगदी पूर्वप्राथमिक विभागापासूनच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.
रोजचे जगणेच एक संघर्ष असल्याने आपल्या मुलाची शाळेतील उपस्थिती याविषयी पालक गांभीर्याने विचार करू शकत नाहीत. त्यामुळे वारंवार गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी सातत्याने संवाद साधून मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यादृष्टीने शाळा प्रयत्न करते. बरेचशे विद्यार्थी घराला आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने पेपर टाकतात, गाडय़ा पुसतात. त्यामुळे त्यांचा हा दिनक्रम लक्षात घेऊन शाळा त्यांना सांभाळून घेते.
बदलत्या काळाची गरज ओळखून सामाजिक संस्थेच्या सहकार्याने शाळेतील पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना ई-लर्निगच्या माध्यमातून शिकवले जात आहे.विद्यार्थ्यांना पुस्तकांशी जोडता यावे, त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेतच एक पुस्तकपेटी तयार करण्यात आली असून एका शिक्षकाकडे त्याची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली आहे. ५० पुस्तकांची पेटी इ. ८वी व ९वीच्या वर्गातून आठवडय़ातून एकदा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते. शिक्षकांसाठी पुस्तकपेटी उपलब्ध करून देणारी कदाचित पहिलीच शाळा (ठाण्यातील) असावी. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिली जाणारी पेटी गेली पाच वर्षे शिक्षकांना वाचनानंद देत आहे.
इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे या विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण अनुभव देण्याचा शाळा कसोशीने प्रयत्न करते. बाळवैभव सदरात शाळेतील ६वीचे विद्यार्थी कथा, कविता, चित्रकला अशा स्वरूपाचे योगदान गेली दोन वर्षे देत आहेत. मराठी दिनाच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या ग्रंथालीच्या उपक्रमात इ.८वी/ ९वीचे विद्यार्थी दरवर्षी सहभागी होतात. त्यामुळे विविध पुस्तके वाचण्याचे, विषय समजून घेण्याचे, ते आत्मविश्वासाने सादर करण्याचे इ. स्वरूपाच्या क्षमता हळूहळू विकसीत होतात. विद्यार्थ्यांना विज्ञान विषय अधिक चांगल्याप्रकारे समजावा, त्यांना त्या विषयाची आवड निर्माण व्हावी म्हणून पर्यावरण दक्षता मंचतर्फे आयोजित पक्षी निरीक्षण, महासूर्यकुंभ, निसर्गमेळा इ. उपक्रमात शाळा सहभागी होते. विद्यार्थ्यांना पर्यावरण जतन करण्याचे महत्त्व कळावे म्हणून शाडू मातीचा गणपती तयार करण्याविषयीची कार्यशाळा, नैसर्गिक रंग तयार करण्याविषयीची कार्यशाळा इ. उपक्रमही केले जातात.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही विचार केला जातो. ‘इनरव्हील क्लब ऑफ ठाणे’ या समाजसेवी संस्थेच्या मदतीने उइउळएरळ करून इ. ८वी ते इ. १०वीच्या विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी करण्यात आली. संस्थेने सर्व विद्यार्थ्यांना हिमोग्लोबीन वाढीसाठी आवश्यक औषधे आणि पौष्टिक खाऊ (चिक्की, राजगिरा लाडू केले इ.) देण्याचे सहकार्य केले. चार महिन्यानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली. ज्यांचे हिमोग्लोबीन वाढले नव्हते त्यांना पुन्हा एकदा औषधे देण्यात आली. याच संस्थेच्या मदतीने ८वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना रूबेला व्हॅस्सेनही देण्यात आले. दहीहंडीच्या वेळी ही संस्था दरवर्षी विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून पुस्तकहंडीचा अनोखा उपक्रम राबवते. लायन्स क्लबतर्फे विज्ञानप्रयोग शाळा शाळेला मिळाली आहे.
शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळांत परीक्षा उत्तीर्ण व्हावी, कोणीही अनुत्तीर्ण होऊ नये असे उद्दिष्ट शाळेसमोर असते आणि सर्व शिक्षक त्यादृष्टीने अथक प्रयत्न करतात असे मुख्या. मंजुषा जोशी (माध्यमिक विभाग) सांगतात. इ.९वीच्या वार्षिक निकालानंतर एप्रिल महिन्यात ज्यादा तासिकांचे नियोजन केले जाते. प्रत्येक विषयाच्या पायाभूत बाबींची माहिती करून दिली जाते. इ. ८वी ते १०वीच्या तुकडय़ांमध्ये अभ्यासानुसार विद्यार्थ्यांचे प्रगत/ अप्रगत गट करून रोज शाळा सुटल्यावर विशेष मार्गदर्शन दिले जाते. इ.१०वीच्या सर्व विद्यार्थ्यांना जूनपासून दररोज मार्गदर्शन दिले जाते. विद्यार्थ्यांना वेगळे मार्गदर्शन दिले जाते. इ.१०वीचा अभ्यासक्रम डिसें.पर्यंत पूर्ण करून नंतर प्रश्नपत्रिकांचा सराव आणि साप्ताहिक परीक्षाही घेतल्या जातात.
मराठी शाळा चालवणे, टिकवणे, विद्यार्थ्यांची गळती थांबवणे इ. गंभीर प्रश्न आज सर्वच मराठी शाळांसमोर आहेत. ती समस्या या शाळेलाही भेडसावत आहे. त्याचबरोबर शाळेच्या इमारतीचे स्वरूप, आजुबाजूचा अस्वच्छ परिसर, हे सर्व पाहताना आपण अस्वस्थ होतो. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जगण्याची वाट खरोखरच अवघड वळणाची आहे हे शाळेतून बाहेर पडताना प्रकर्षांने जाणवते. एकीकडे हजारो/लाखो रु. दरवर्षी भरू शकणारे पालक आणि एकीकडे गाडय़ा पुसून पालकांना मदत करणारी मुले हे वास्तव मनाला अंर्तमुख करून टाकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा