शहरातील झाडांसाठी पावसाळ्याचे दिवस सर्वाधिक धोकादायक असतात. कारण याकाळात शहरातील अनेक भागातील झाडे उन्मळून पडतात. त्यामुळे शहरातील हरीतपट्टा उजाड होत असतो. पावसाळ्यापूर्वी या झाडांची आवश्यकतेनुसार छाटणी करून ही झाडे वाचविता येतात. २०१५ मध्ये ठाणे शहरात शंभरहून अधिक झाडे कोसळली होती तर यंदाच्यावर्षी उन्मळून पडणाऱ्या झाडांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. रस्ता रूंदीकरणामुळे जमीन भुसभुशीत झाल्याने अनेक झाडे पडण्याची शक्यता लक्षात घेता अशा झाडांची छाटणी करणे तसेच त्यांना आवश्यक आधार देणे गरजेचे बनले आहे. मात्र सध्या महापालिकेने यासाठी आवश्यक उपाय योजना केल्याचे दिसून येत नसल्याने यंदाचा पावसाळा झाडांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाणे शहरामध्ये मोठा हरीत पट्टा असून शहरात सावलीचे वातावरण निर्माण करण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये येथील झाडांचा मोठा सहभाग आहे. मात्र पावसाळ्यात येणारी मोठी वादळे आणि मुसळधार पावसामुळे झाडे मुळासकट उपटली जाऊ लागली आहेत. झाडांच्या अनावश्यक फांद्याची छाटणी करून ही संभाव्य आपत्ती टाळता येऊ शकते. शिवाय त्यामुळे या झाडांची चांगली वाढही होत असते. शहरातील मुख्य रस्त्यांवरील दिव्यांवर झाडांच्या फांद्या येऊन झाडाखाली अंधार येत असतो. छाटणीमुळे दिव्यांचा प्रकाशही नीटपणे रस्त्यावर पडतो. महापालिका प्रशासन यासंदर्भात ठेकेदारांकडून काम करून घेत असली तरी
ते ठेकेदार चांगले काम करतात की नाही, यावर देखरेख ठेवली जात नाही. त्याचा फटका झाडांना बसतो. झाडांची शास्त्रोक्त पध्दतीने छाटणी न झाल्यास झाड मरण्याचाही धोका असतो. त्यामुळे पुरेशी काळजी घेऊनच झाडांची छाटणी आवश्यक असते. ठाणे महापालिकेने याकडे आवश्यक लक्ष देऊन शहरातील अनावश्यक फांद्यांची शास्त्रोक्त पध्दतीने छाटणी करून झांडांचे कोसळणे दुर करण्याच्या दृष्टीने प्रयत्नाची गरज आहे. अन्यथा अनेकदा छाटणीच्या नावाखाली झाडांची पूर्णपणे कत्तल केली जाण्याची शक्यताही अधिक असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा